कर्ज काढणे हाच सर्वोत्तम उपाय – पवार

या संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलून याबाबत आपण विनंती करणार आहोत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

तुळजापूर : राज्यातील संकटाचं स्वरूप लक्षात घेता त्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्याची विनंती त्यांना करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्यातील गावांना दोन दिवस प्रत्यक्ष भेटी दिल्यावर आणि पाहणी केल्यावर शरद पवारांनी सोमवारी सकाळी तुळजापूर सर्कीट हाऊसवर पत्रकार परिषद घेतली.

पीकविम्याचे जे निकष आहेत ते शिथिल करून मदत देण्यात यावी, असं त्यांनी म्हटलंय. पुरात वाहून गेलेल्या सोयाबीनचे पंचनामे करता येणार नाहीत. त्यामुळं सोयाबीन उत्पादकांनाही थेट मदत देण्याची गरज असल्याचं पवारांनी म्हटलंय. त्यासाठी नियमांत काही बदल करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

“जमिनीची धूप झाली आहे. पाझर तलाव, व रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या सगळ्यासाठी जिल्हा नियोजनचा निधी पुरेसा ठरणार नाही. त्यामुळे यासाठी स्वतंत्र मदत देण्याचा निर्णय राज्य व केंद्र सरकारने घ्यावा”, अशी मागणी पवारांनी केलीय.

उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर परिसर या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर भागात असंच चित्र आहे. उस्मानाबाद हा सबंध जिल्हाच संकटात असल्याचं दिसत आहे.

पाहणी केल्यानंतर पवारांनी सांगितले, “पहिली गोष्ट म्हणजे पीकपद्धतीत बदल झालाय. सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर होती. सोयाबीनचं पीक अतिवृष्टीमुळे कुजलंय,  वाहून गेलंय किंवा उध्वस्त झालंय. या जिल्हयात पाच वर्षाचा आढावा घेतला तर दोन ते तीन वर्षे ऊसाचं पीक या जिल्हयात येतं. या भागात काही वर्षांच्या अंतराने ऊसाचं पीक घेतलं जातं. यंदा ऊसाचं पीकही शेतकऱ्यांनी घेतलं होतं. आणि अतिवृष्टीचा परिणाम ऊसाच्या पिकावरही झाला आहे. या जिल्ह्यातली कारखानदारी जर लवकर सुरू झाली तर कदाचित काही ऊसाचा गाळपासाठी उपयोग होणं शक्य होणार आहे. म्हणून राज्य सरकारच्या सहकार खात्याशी कारखानदारी लवकर सुरू करता येईल का? याबाबत विचारणा करणार आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

“अडचण अशी आहे की ऊसाच्या क्षेत्रात जाऊन तोडणी करून चिखलातून वाहतूक करणं सोपं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा प्रवाह बदलल्याने शेती मातीसकट उध्वस्त झाली आहे. जमीनच उद्ध्वस्त झाल्यामुळे अनेक वर्षे त्या शेतकऱ्यांना उभं राहणं सोपं नाही. त्याला फार मोठ्या प्रमाणावर मदत केल्याशिवाय ते संकटातून उभं राहणं काही सोपं नाही. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या जमिनीतली बांधबंदिस्तीही उध्वस्त झाली आहे. प्रवाहामुळे बांध फुटले आहेत. शेतकऱ्याच्या दृष्टीने तेही सोपं नाही. काही ठिकाणी नदीकाठी, ओढ्याकाठी शेतकऱ्यांनी विहीरी बांधल्या होत्या. इंजिनं आणि पाइपलाइन्स टाकल्या होत्या. अनेक ठिकाणी हे सगळं वाहून गेलं आहे. काहींची जनावरं वाहून गेल्याचं लोक सांगतात. काही ठिकाणी घरंदारं पडल्याची दिसतात. आणि गावपातळीवर रस्ते सगळे उध्वस्त झालेले आहेत.यासाठी फार मोठी गुंतवणूक करण्याची गरज आहे” असंही शरद पवार म्हणाले.