३० कोटी रुपयांमध्ये ‘हंगामा २’ ची ओटीटीवर विक्री, निर्मात्यांना सौदा ठरणार फायदेशीर!

भूत पोलीस' हा आपला बहुप्रतिक्षीत चित्रपट डिस्ने प्लस हॅाटस्टारला ६० कोटी रुपयांना विकल्यानंतर ३० कोटींचा 'हंगामा' प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. '

    या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून कोरोनाबाबतचे निर्बंध काहीसे शिथिल झाले असले तरी मनोरंजन विश्वाला याचा दिलासा मिळालेला नाही. यासाठी आता १५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतर जरी शूटिंगला परवानगी मिळाली तरी सिनेमागृहांची कवाडं उघडतील असं ठामपणे सांगता येत नाही. या परिस्थितीत आता मोठ मोठे निर्माते ओटीटीची वाट चालू लागल्याचं पहायला मिळतं. रमेश तौरानींसारख्या बड्या निर्मात्यांनी ‘भूत पोलीस’ हा आपला बहुप्रतिक्षीत चित्रपट डिस्ने प्लस हॅाटस्टारला ६० कोटी रुपयांना विकल्यानंतर ३० कोटींचा ‘हंगामा’ प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘भूत पोलीस’ चित्रपटानंतर डिस्ने प्लस हॅाटस्टारनं आणखी एक मोठी डील क्रॅक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

    दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा ‘हंगामा २’ हा चित्रपटही याच ओटीटीनं घेतल्याचं समजतं. परेश रावल, शिल्पा शेट्टी, मीझान जाफरी, प्रणिता सुभाष, राजपाल यादव आणि मनोज जोशी यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट ‘हंगामा’चा सिक्वेल आहे. पहिल्या भागात मुख्य भूमिकेत दिसलेल्या अक्षय खन्नानं सिक्वेलमध्ये कॅमिओ केला आहे. ३० कोटी रुपयांमध्ये ‘हंगामा २’ची डील डन झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. याखेरीज टीव्ही प्रीमियरसाठी सहा ते आठ कोटी रुपये मिळून हा आकडा ३६ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

    हे चित्र पाहता या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या व्हीनससाठी हा सौदा फायद्याचं ठरल्याचं बोललं जात आहे. याशिवाय इतर माध्यमांतून मिळणारं उत्पन्न पाहता हा चित्रपट ४५ कोटी कमाई करणार असून, यातून निर्माते रतन जैन यांना कमीत कमी १० कोटींचा नफा होणार असल्याचं बोललं जात आहे.