सुनांनी मिळून बांधले सासूचे मंदिर; रोज करतात पूजा आणि आरती

कुणी लक्ष्मीची पूजा करतं, कुणी गौरीची पूजा करतं पण  बिलासपूरच्या रतनपूरमधील तंबोली कुटुंबातील सुना मात्र सासूदेवीची पूजा करतात. ऐकून नवल  वाटेल पण खरंच या सुना आपल्या सासूलाच देवी मानतात. फक्त मानत नाही तर तिची मूर्ती स्थापन करून तिची पूजाही त्या करतात.

रायपूर. सासू आणि सून म्हणजे ३६ चा आकडा असे म्हंटले जाते. सासवा सुनांचे भांडण किंवा मतभेद हे काही नवीन नाही पण छत्तीसगडमधील सासू-सून याला अपवाद ठरल्या. येथे सुनांनी  चक्क आपल्या सासूचं मंदिर बांधलं आहे. इतकंच नव्हे तर दररोज त्या तिची पूजा, आरतीही करतात.

कुणी लक्ष्मीची पूजा करतं, कुणी गौरीची पूजा करतं पण  बिलासपूरच्या रतनपूरमधील तंबोली कुटुंबातील सुना मात्र सासूदेवीची पूजा करतात. ऐकून नवल  वाटेल पण खरंच या सुना आपल्या सासूलाच देवी मानतात. फक्त मानत नाही तर तिची मूर्ती स्थापन करून तिची पूजाही त्या करतात.

तंबोली कुटुंबातील ११ सुना एकत्र गुण्यागोविंदानं राहतात. त्यांचं आपली सासू गीतीदेवीवर खूप प्रेम. २०१० साली त्यांचं निधन झालं. त्यामुळे या सुनांंना मोठा धक्का बसला. अगदी आईसारखं प्रेम देणारी प्रेमळ सासू गेल्याचं दुःख या सुनांना झालं. त्यांची कमी त्यांना जाणवू लागली. त्यामुळे या सुनांनी चक्क सासूचं मंदिरच बांधलं.

सुनांनी मंदिरात आपल्या सासूची मूर्ती स्थापित केली. या मूर्तीला सोन्याच्या दागिन्यांनी मढवलं आहे आणि दररोज तिची पूजा केली जाते. इतकंच नव्हे तर महिन्यातून एकदा या मूर्तीसमोर भजनही केलं जातं.

गीतादेवी यांच्या स्वतःच्या ३ सुना आणि इतर लहान जावा त्यांच्या सुना. या सर्व सुनांवर त्या आईसारखं तर जावांवर बहिणींसारखं प्रेम करायच्या. प्रत्येक निर्णय त्यांना विचारून घ्यायच्या. गीतादेवी यांनी कुटुंबाला जोडून ठेवलं होतं.  तंबोली कुटुंबातील सर्व सुना शिकलेल्या आहेत. कुटुंबाचा आर्थिक गाडाही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला आहे. कुटुंबाला सांभाळत त्या कुटुंबाला आर्थिक मदतही करतात. गीतादेवी यांनीदेखील आपल्या सुनांवर कधीच कोणती बंधनं लादली नाहीत. त्या आपल्या सुनांसाठी आईपेक्षा कमी नव्हत्या. अशी सासू गमावल्यानंतर आपली आई गमवावी असंच दु:ख या सुनांना झालं आणि त्यामुळेच हे सासू सुनेच्या एका वेगळ्या नात्याचे प्रतीक म्हणून हे मंदिर साक्ष देत आहे.