प. बंगालची निवडणूक रणधुमाळी : भाजप पूर्ण ताकदिनीशी लढणार विधानसभा निवडणूक

पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. यासाठी भाजपने ११७ सदस्यीय निवडणूक व्यवस्थापन समितीचे गठन केले आहे. या समितीतील सदस्यांना ३१ युनिट्समध्ये विभागण्यात आले आहे. सर्वांना वेगवेगळे टास्क देण्यात आले आहे. एका युनिटचे काम एनआरआयसोबत समन्वय प्रस्थापित करण्याचे आहे तर, एका युनिटवर टेडा संग्रहणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बुथ व्यवस्थापनापासून तर सोशल मीडिया व्यवस्थापनापर्यंतच्या जबाबदाऱ्यांचेही वाटप करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाशी समन्वय राखण्यासाठीदेखील एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

  • भाजपच्या ११७ नेत्यांवर बंगाल जिंकण्याची जबाबदारी; नेत्यांपुढे ‘करो या मरो’चीच स्थिती

कोलकाता (Kolkata).  पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. यासाठी भाजपने ११७ सदस्यीय निवडणूक व्यवस्थापन समितीचे गठन केले आहे. या समितीतील सदस्यांना ३१ युनिट्समध्ये विभागण्यात आले आहे. सर्वांना वेगवेगळे टास्क देण्यात आले आहे. एका युनिटचे काम एनआरआयसोबत समन्वय प्रस्थापित करण्याचे आहे तर, एका युनिटवर टेडा संग्रहणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बुथ व्यवस्थापनापासून तर सोशल मीडिया व्यवस्थापनापर्यंतच्या जबाबदाऱ्यांचेही वाटप करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाशी समन्वय राखण्यासाठीदेखील एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

अमित शाह आणि जे. पी. नड्डांचा ‘वॉच’

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बंगालमध्ये ४० टक्के मते मिळाली होती. भाजपने राज्यातील ४२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. यामुळे भाजपचा उत्साह वाढला असून आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. २९४ सदस्य असलेल्या बंगाल विधानसभेसाठी पुढील वर्षी मई महिन्यात निवडणूक घेतली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या या सर्वच समित्या केंद्रीय नेतृत्वाच्या देखरेखेखाली काम करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा या समितीवर थेट ‘वॉच’ असेल आणि ते निवडणूक संपेपर्यंत प्रत्येक महिन्यातील काही दिवस बंगालमध्ये राहतील, असे सांगितले जात आहे.

अशी आहे निवडणुकीची रणनीती
विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करताच भाजपने सर्वप्रथम आपल्या ५ केंद्रीय नेत्यांना राज्यातील सर्व पाच संघटनात्मक क्षेत्रातील बुथस्तरापर्यंत पक्ष संघटनेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पाठविले होते. या नेत्यांनी आपला अहवाल शाह आणि नड्डा यांना सोपविला होता. याबाबतची माहिती असलेल्या पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या मते, भाजपाचे २९४ नेते निवडणूक प्रचारासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत कार्यरत राहतील. हे नेते दिल्ली आणि इतर राज्यातील बंगालमध्ये येतील. त्यांचा प्रत्येक मतदार संघासाठी स्थापित केल्या जाणाऱ्या ४५ सदस्यीय समितीतही समावेश असेल. सध्याच्या जिल्हा समित्या या नेत्यांची मदत करतील. याशिवाय, भाजपने माध्यमांच्या संपर्कात राहण्यासाठी एका समितीचीही स्थापना केली आहे. या समितीतील नेते प्रसारमाध्यमांवरील मुलाखतीत सहभागी होतील.

शुभेंदु अधिकारींचा ‘चॅप्टर क्लोज’- तृणमूल काँग्रेस

असंतुष्ट नेते शुभेंदु अधिकारी यांच्या मनधरणीसाठी आता कोणतेही प्रयत्न केले जाणार नसल्याचे सांगत तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) त्यांचा चॅप्टर क्लोज केल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी पक्षश्रेष्ठींनी, शुभेंदु अधिकारी यांनी पक्षातच राहावे यासाठी त्यांची मनधरणी करणे तसेच त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी आता कुठलेही प्रयत्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शुभेंदु अधिकारी यांना काही बोलायचे असेल तर त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पक्ष तयार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

विशेष परिणाम होणार नाही– सौगत राय

टीएमसी आणि शुभेंदु अधिकारींमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सौगत राय यांनी कुणाचेही नाव न घेता सांगितले की, टीएमसी एक मोठा राजकीय पक्ष आहे, आमच्याकडे ममता बॅनर्जींसारख्या नेत्या आहेत. जर एक-दोन नेते आम्हाला सोडून गेले तरी पक्षावर विशेष असा परिणाम होणार नाही. याशिवाय, टीएमसीच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपले नाव न जाहीर करण्याच्या अटीवर यापुढे शुभेंदु अधिकारींसोबत कोणतीही चर्चा करू नये, असा आदेश पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांनी दिला असल्याचे सांगितले.

भाजप नेत्याची ममतांना शिवीगाळ

पश्चिम बंगालमध्ये प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच भाजप अध्यक्ष आणि नेता दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींना शिवीगाळ करत अपशब्द वापरला आहे. दिलीप घोष यांनी मर्यादा सोडली असून अपशब्द वापरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जय श्रीराम म्हणण्यात ममता बॅनर्जी यांना काय त्रास होतो? असा प्रश्न उपस्थित करत भाजप नेता दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींसाठी अक्षेपार्ह शब्द वापरत शिवीगाळ केली. ममता बॅनर्जी यांच्या रक्तात काय आहे? त्या जय श्री राम म्हणू शकत नाहीत. श्रीरामासोबत असे वर्तन का केले जात आहे. आम्ही सत्तेत आल्यावर कार्यकर्त्यांच्या सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दिलीप घोष यांनी मर्यादा सोडत अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे सध्या वातावरण तप्त झाले आहे.