yogi adityanath

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा असणाऱ्या 112 च्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. अशाप्रकारे योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही काही पहिलीच घटना नाही. मात्र, असे असले तरी पोलिसांनी या मेसेजची दखल घेतली असून या प्रकरणामध्ये सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये ज्या क्रमांकावरून मेसेज आला आहे त्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

    लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा असणाऱ्या 112 च्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. अशाप्रकारे योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही काही पहिलीच घटना नाही. मात्र, असे असले तरी पोलिसांनी या मेसेजची दखल घेतली असून या प्रकरणामध्ये सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये ज्या क्रमांकावरून मेसेज आला आहे त्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

    अज्ञात क्रमांकावरून मॅसेज

    समोर आलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी सायंकाळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या आपत्कालीन सेवा असणाऱ्या 112 या क्रमांकाच्या व्हॉट्सअप एका अज्ञात क्रमांकावरून मेसेज पाठवून योगींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीमध्ये मुख्यमंत्री योगींकडे चार दिवसांचा वेळ शिल्लक असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पुढील चार दिवसात माझे जे काही करायचे आहे ते करा, पाचव्या दिवशी मुख्यमंत्री योगी यांना मी ठार मारणार आहे, असे या धमकीत म्हटले आहे.

    पोलिस विभागात गोंधळ

    थेट मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या या मेसेजमुळे पोलिस विभागामध्ये एकच गोंधळ उडालाय. धमकी ज्या क्रमांकावरून आली त्या क्रमांकाचा तपास करण्यासाठी एक सर्व्हिलन्स टीम स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये लखनौमधील सुशांत गोल्फ सिटी येथील कंट्रोल रूममध्ये 112चे ऑप्रेशन कमांडर अंजुल कुमार यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष टीम स्थापन करण्यात आली. ही टीम या प्रकरणामधील तपासावर लक्ष ठेऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी मदत करणार असल्याचे म्हटले आहे.