क्लार्कच्या घरात इतकी संपत्ती कशी काय बुवा ? २ कोटी, ८ किलो सोनं आणि नोटा मोजण्याची मशीन सापडल्याने सीबीआयचे अधिकारी पडले बुचकळ्यात

क्लार्क(Clerk) असलेल्या एका माणसाच्या घरी २.१७ कोटी रुपये, ८ किलो सोनं आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे.

  भोपाळ:भोपाळमध्ये(Bhopal) फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय)मध्ये क्लार्क असलेल्या एका माणसाच्या घरी २.१७ कोटी रुपये, ८ किलो सोनं आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. भ्रष्टाचार प्रकरणाच्या(Corruption) तक्रारी आल्यानंतर सीबीआयच्या(CBI Raid) एका टीमने या क्लार्कच्या घरी छापे मारल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला आहे.

  किशोर मीणा असं या क्लार्कचं नाव आहे. तो छोला परिसरात राहतो. सीबीआयकडे मीणाविरोधात लाचेच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे सीबीआयने शुक्रवारी रात्री त्याच्या घरी छापा मारला.त्यात हे घबाड सापडलं आहे. त्याच्या घरी सीबीआयची अजूनही कार्यवाही सुरू आहे. तसेच त्याच्या घरातून भ्रष्टाचाराचे पुरावेही सापडले आहेत. या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने एफसीआयच्या डिव्हिजनल मॅनेजरसह चौघांना अटक केली आहे. यातील तीन मॅनेजरच्या लाचेची रक्कम किशोर मीणा स्वत:कडेच ठेवत असल्याची माहितीही मिळाली आहे.

  गुडगाव येथील एका सिक्युरिटी एजन्सीने भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. त्यानंतर किशोर मीणासह तीन लोकांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. त्यानंतर पुढची कारवाई करण्यात आली. मीणा याची चौकशी केली असता लाचेची रक्कम तो घरीच ठेवत असल्याचं उघड झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार मीणा हा सुरुवातीला एफसीआयमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. बड्या अधिकाऱ्यांसोबत भ्रष्टाचार करू लागल्याने त्याला क्लार्क करण्यात आलं होतं.

  सीबीआयने मीणाच्या घरातून २.१७ कोटी रुपये जप्त केले आहेत. सोबत नोटा मोजण्याची मशीनही जप्त केली आहे. त्यासोबतच ८ किलो सोनं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. एका साध्या क्लार्ककडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर खजिना सापडल्याने सीबीआयचे अधिकारीही चक्रावून गेले होते.

  गुडगावच्या सिक्युरिटी कंपनीने सीबीआयकडे भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. एफसीआयचे मॅनेजर दुसऱ्या कर्मचाऱ्यांशी हात मिळवणी करून उघडपणे लाच घेत आहेत, अशी तक्रार करण्यात आली होती. ही खबर मिळताच सीबीआयने जाळं पसरलं. सीबीआयने आरोपींना एका मंदिरात बोलावलं होतं. तिथं लाच घेताना आरोपींना रंगेहाथ पकण्यात आलं.