रेल रोको करणं माजी खासदाराला पडलं महागात, झाला २ वर्षांचा तुरुंगवास

काँग्रेसच्या माजी खासदार अन्नू टंडन यांना रेल रोको केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. उन्नावमधील काँग्रेसचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनादेखील शिक्षा सुनावण्यात आलीय. शिक्षेसोबत या सर्वांना न्यायालयानं २५ हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला आहे. 

    मोर्चे आणि आंदोलनं हे नेहमीच विरोधी पक्षांचं हुकुमी अस्त्र राहिलंय. सरकारविरोधातील किंवा व्यवस्थेविरोधातील आवाज बुलंद करण्यासाठी वेगवेगळी आंदोलन नेहमीच होत असतात. काहीजण अनोख्या पद्धतीनं आदोलनं करतात, तर काहीजण ठरलेली आंदोलनं करत असतात. आपल्या मागण्यांसाठी आणि व्यवस्थेचं लक्ष वेधून घेण्यासाठी रेल्वे रोखून धरणे, हा त्यातलाच एक प्रकार. मात्र काँग्रेसच्या एका माजी खासदाराला रेलरोको आंदोलन चांगलंच महागात पडलं.

    काँग्रेसच्या माजी खासदार अन्नू टंडन यांना रेल रोको केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. उन्नावमधील काँग्रेसचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनादेखील शिक्षा सुनावण्यात आलीय. शिक्षेसोबत या सर्वांना न्यायालयानं २५ हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला आहे.

    १२ जून २०१७ रोजी रेल्वे पोलीस दलानं या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या सर्वांनी उन्नाव रेल्वे स्थानकावर आंदोलन केलं होतं. यावेळी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला उभ्या असणाऱ्या एका ट्रेनवर हे आंदोलक चढले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. ट्रेनच्या इंजिनावरही हे आंदोलक चढले होते. या आंदोलकांचं नेतृत्व अन्नू टंडन करत होत्या. या आंदोलनामुळे रेल्वेला १२ मिनिटं उशीर झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकऱणात २०१८ साली न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती.

    दरम्यान, हे आंदोलन झालं त्यावेळी अन्नू टंडन या काँग्रेसमध्ये होत्या. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत त्यांनी सपामध्ये प्रवेश केला होता.