बाबा रामदेवांच्या आश्रमात कोरोनाचा धुमाकूळ, ३९ कर्मचाऱ्यांना कोरोना, हरिद्वारमध्ये १५० पाहुणे पॉझिटीव्ह

डेहराडूनमधील पतंजलीच्या आचार्यकुलम, योगपीठ आणि योगग्राम या बाबा रामदेव संचलित तीन आश्रमांत मिळून ३९ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आलीय. तर जुना आखाडा या ठिकाणच्या ९ आणि निर्जनी आखाडा या ठिकाणच्या २ अभ्यागतांचा कोरोना चाचणी अहवालादेखील पॉझिटीव्ह आलाय. हरिद्वारच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिलीय. 

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घालायला सुरुवात केलीय. भारतात दररोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा २ लाखांच्याही वर गेलाय. अशात भारतातील प्रसिद्ध योगगुरु बाबा रामदेव यांच्या विविध आश्रमांमध्येही कोरोनानं शिरकाव केल्याचं समजतंय. बाबा रामदेवांच्या आश्रमातील कर्मचाऱ्यांना आणि अभ्यागतांनाही कोरोनाची लागण झालीय.

    डेहराडूनमधील पतंजलीच्या आचार्यकुलम, योगपीठ आणि योगग्राम या बाबा रामदेव संचलित तीन आश्रमांत मिळून ३९ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आलीय. तर जुना आखाडा या ठिकाणच्या ९ आणि निर्जनी आखाडा या ठिकाणच्या २ अभ्यागतांचा कोरोना चाचणी अहवालादेखील पॉझिटीव्ह आलाय. हरिद्वारच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिलीय.

    मिळालेल्या माहितीनुसार रविवारी हरिद्वारमध्ये एकूण २०३४ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. रविवारी केलेल्या या चाचणीत २३ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेत. तर ८५२ चाचण्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत हरिद्वारमध्ये आलेल्या १५० अभ्यागतांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. १ एप्रिलनंतर केलेल्या टेस्टची ही आकडेवारी असल्याचं सांगण्यात आलंय.

    रुडकीच्या आयआयटीमध्येदेखील आतापर्यंत २९६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं दिसून आलंय. गेल्या रविवारी यात ७१ केसेसची भर पडलीय. देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्या त्या राज्यांनी कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होतेय.