केरळमधील भूस्खलनात ५ जणांचा मृत्यू

  • एका क्षणात संपूर्ण वस्ती जमीनदोस्त होऊन जवळपास ८० हून अधिक मजूर भूस्खलनात दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन व्यवस्थापन आणि एनडीआरएफच्या पोलीस पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तिरुअनंतरपुरम :  इडुकी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका क्षणात संपूर्ण वस्ती जमीनदोस्त होऊन जवळपास ८० हून अधिक मजूर भूस्खलनात दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन व्यवस्थापन आणि एनडीआरएफच्या पोलीस पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी बचावकार्याला सुरूवात केली असता १० जणांना बाहेर सुखरूप काढण्यात यश आलं आहे.   

भूस्खलन झालेल्या ठिकाणी  बचाव कार्य सुरू आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.  ज्या ठिकाणी भूस्खलन झालं. तिथे चहाच्या बागेत काम करणारे मजूर राहात असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु या घटनेनंतर यापैकी बहुतेक मजूर तमिळनाडूचे असल्याचंही सांगितलं जात आहे. मुसळधार पावसामुळे केरळमध्ये घडलेल्या या मोठ्या दुर्घटनेत बचाव कार्य करण्यास आपत्कालीन व्यवस्थापन आणि एनडीआरएफच्या पथकांना अडथळा निर्माण होत आहे.