कोलकात्यात रेल्वेच्या इमारतीला आग, ९ जणांचा मृत्यू, आगीवरून आरोप-प्रत्यारोप

कोलकात्यात लागलेल्या या आगीची तीव्रता इतकी होती यात ५ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ही आग विझवण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन दलाच्या ४ जवानांचाही यात मृत्यू झाला. ही आग आटोक्यात आल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे खात्यावर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे आग विझवायला विलंब झाल्याचा दावा त्यांनी केला. 

    पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले. कोलकात्यातील स्टँड रोड परिसरात १३ व्या मजल्यावर लागलेली ही आग भडकत गेली. आग लागल्यानंतर अग्नीशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले.

    कोलकात्यात लागलेल्या या आगीची तीव्रता इतकी होती यात ५ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ही आग विझवण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन दलाच्या ४ जवानांचाही यात मृत्यू झाला. ही आग आटोक्यात आल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे खात्यावर निष्काळजीपणाचा आरोप केलाय. रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे आग विझवायला विलंब झाल्याचा दावा त्यांनी केला.

    रेल्वेकडून इमारतीचा नकाशा अग्निशमन दलाला वेळेत पुरवला गेला नाही. त्यामुळे अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात मर्यादा येत असल्याचा मुद्दा ममता बॅनर्जी यांनी मांडला. इमारतीचा नकाशा अगोदर मिळाला असता तर अधिक जलद ही आग विझवता आली असती आणि कर्मचाऱ्यांचे प्राणदेखील गेले नसते, असा दावा मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केलाय.

    या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. तर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीेदेखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय. सध्या या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आलंय. रेल्वेच्या पूर्व आणि दक्षिण-पूर्व विभागांची कार्यालयं या इमारतीत आहेत.

    ही आग कशामुळे लागली आणि भडकली याचं कुठलंही ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. याच इमारतीच्या तळमजल्यावर ऑनलाईन तिकीट केंद्र आहे. आग लागल्यानंतर आता पूर्व विभागातील रेल्वेचं ऑनलाईन बुकिंग सध्या थांबवण्यात आलंय.