श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात लागलेल्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू

तेलंगणा : तेलंगणातील श्रीशैलम हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पात गुरूवारी मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. पॉवर हाऊसमध्येच लागलेल्या या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना कळल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनसाठी एनडीआरएफची तुकडी बोलवण्यात आलेली. एनडीआरएफच्या जवानांचे आगीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सूरु होते. मात्र ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांच्या प्रयत्नांना अपयश आले. येथील बचाव मोहीम अजूनही सुरू आहे. लेफ्ट बँक पॉवर स्टेशनमध्ये तीन कर्मचारी अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या सीमा भागात आहे . गुरूवारी मध्यरात्री अचानक या प्रकल्पातील पॉवर हाऊसमध्ये आगीचा भडका उडाला.तेथे एकूण १९ कर्मचारी होते. त्यापैकी ९ कर्मचारी आगीच्या ठिकाणी अडकून पडले. या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला बोलविण्यात आलेले. मात्र, दुर्देवाने या घटनेत ९ जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. या जवानांना त्या ९ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात अपयश आले. शुक्रवारी दुपारी आधी सहा तर थोड्या वेळानं आणखी तीन जणांचे मृतदेह जवानांना मिळाले. अद्याप येथील बचाव कार्य सुरु असून लेफ्ट बँक पॉवर स्टेशनमध्ये अडकलेल्या तीन कर्मचाऱ्यांना काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, या आगीच्या घटनेची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गंभीर दखल घेतली असून या घटनेचा तपास सीआयडीकडे देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यासाठी सीआयडीचे अतिरिक्त संचालक गोविंद सिंह यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. “ही घटना दुर्दैवी आहे. अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करण्यात आले, पण त्यांचा दुःखद अंत झाला,” असं राव यांनी म्हटलं आहे.