इथे एक कप चहाची किंमत आहे तब्बल १००० रुपये ; ही आहे खासियत

कोलकातामध्ये राहाणाऱ्या पार्थ प्रतिम गांगुली यांचं मुकुंदपूरमध्ये चहाच्या दुकानात १२ रुपये प्रति कपपासून १००० रुपये प्रति कपपर्यंतचा चहा मिळतो. सर्वात महत्वाचे म्हणजे हे दुकान कुठल्या शॉपिंग मॉल किंवा मोठ्या शोरुममध्ये नाही तर रस्त्याच्या कडेला आहे.

    कोलकाता: पश्चिम बंगाल सध्या विधानसभा निवणुकीमुळे चर्चेत आहे. भाजप आणि तृणमूल संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकांच्या रिंगणात उतरल्याने या निवडणुकांकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीत आता एक चहाचं दुकानंही (Tea Stall) चर्चेत आलं आहे. दुकानाच्या चर्चेच कारण म्हणजे इथे विकला जाणारा महाग चहा होय. एरवी आपल्या दृष्टीने चहाच्या किंमती केवळ ५ रुपये प्रतिकपापासून सुरू होऊन जास्तीत जास्त १०० रुपयांपर्यंत येऊन थांबतात . मात्र कोलकातामध्ये राहाणाऱ्या पार्थ प्रतिम गांगुली यांचं मुकुंदपूरमध्ये चहाच्या दुकानात १२ रुपये प्रति कपपासून १००० रुपये प्रति कपपर्यंतचा चहा मिळतो.सर्वात महत्वाचे म्हणजे हे दुकान कुठल्या शॉपिंग मॉल किंवा मोठ्या शोरुममध्ये नाही तर रस्त्याच्या कडेला आहे.

    एवढ्या प्रकारच्या मिळतात चहा पार्थ यांच्या दुकानात १०० वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळतात. यात सिल्वर नीडल व्हाईट टी, लेवेंडर टी, हिबिस्कस टी, वाइन टी, तुलसी जिंजर टी, ब्लू टिश्यन टी, तीस्ता वॅली टी, मकईबारी टी, रूबियोस टी आणि ओक्टी टी यांचाही समावेश आहे.  अनेक चहाप्रेमी जेव्हा केव्हा कोलकातामध्ये येतात तेव्हा या दुकानातील चहा पिल्याशिवाय जात नाहीत.

    इथे मिळणारा ‘हा’ आहे जगातील सर्वात शुद्ध चहा
    या दुकानात जो चहा १००० प्रति कप या दरात मिळतो तो आहे सिल्‍वर नीडल व्हाईट टी. हा चहा जगातील सर्वात शुद्ध चहांमधील एक असल्याचं मानलं जातं. सोबतच या चहाच्या निर्मितीसाठीही सामान्य चहापेक्षा तीन पट अधिक कामगार आणि वेळही लागतो. याच कारणामुळं हा चहा इतका महाग आहे.