गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये नोटांचे घबाड; पोलिसही चक्रावून गेले, बँकांकडून मशीन मागवली

राजस्थानच्या डुंगरपूर येथे दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारची तपासणी करण्यात आली असता त्यात नोटांचे घबाड सापडले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या नोटा मोजण्यास सुरुवात केली. सकाळपासून या नोटांची मोजणी सुरू होती. नोटा एवढ्या प्रमाणावर होत्या की नोटा मोजता मोजता संध्याकाळ उलटली. त्यामुळे पोलिस आणि अधिकारीही चक्रावून गेले. कोट्यवधी रुपये घेऊन निघालेली ही कार दिल्लीहून गुजरातला जात होती, असे सांगितले जात आहे.

    जयपूर : राजस्थानच्या डुंगरपूर येथे दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारची तपासणी करण्यात आली असता त्यात नोटांचे घबाड सापडले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या नोटा मोजण्यास सुरुवात केली. सकाळपासून या नोटांची मोजणी सुरू होती. नोटा एवढ्या प्रमाणावर होत्या की नोटा मोजता मोजता संध्याकाळ उलटली. त्यामुळे पोलिस आणि अधिकारीही चक्रावून गेले. कोट्यवधी रुपये घेऊन निघालेली ही कार दिल्लीहून गुजरातला जात होती, असे सांगितले जात आहे.

    हवाल्याची रक्कम?

    कारमधील ही रक्कम हवाला व्यवसायातील असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. शनिवारी डुंगरपूर जिल्ह्यातील बिछीवाडा पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 8 वर एक कार अडवली. या कारची तपासणी केली असता त्यात नोटांचे घबाड आढळून आले. एक दोन लाख नव्हे तर तब्बल 4.5 कोटी रुपये या कारमधून जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. हा पैसा हवाला मार्गे आला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

    बँकांकडून मशीन मागवली

    कारमध्ये प्रचंड प्रमाणात नोटा सापडल्याने पोलिसही चक्रावून गेले. ही रक्कम किती असेल याचा अंदाज पोलिसांना येत नव्हता. शिवाय हाताने नोटा मोजणेही शक्य नव्हते. पोलिस ठाण्यात नोट मोजण्याची मशीन नव्हती. त्यामुळे बँकांमधून नोट मोजण्याची मशीन मागवण्यात आली. सकाळपासून मशीनने या नोटा मोजण्यात आल्या. नोटा मोजता मोजता संध्याकाळ झाली. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही दमछाक झाली. ही संपूर्ण रक्कम 4.5 कोटी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. DL8CA X3573 या क्रमांकाच्या गाडीत या नोटा सापडल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.