गरीब विद्यार्थ्यांसाठी एका शिक्षकाचा अनोखा उपक्रम, सुरू केलं स्कूटरवरचं वाचनालय

श्रीवास्तव सरांनी पदरचे पैसे खर्च करून स्वतःच्या स्कूटरवर एक वाचनालय उभं केलं आणि हे वाचनालय घेऊन तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये जायला सुरुवात केली. जिथं जिथं हे वाचनालय पोहोचतं, तिथले विद्यार्थी त्यांना हवं असणारं पुस्तक घेतात आणि अगोदर घेतलेली पुस्तकं जमा करतात. त्यामुळं विद्यार्थ्याना सतत नवनवी पुस्तकं मिळत राहतात आणि त्यांचं वाचन आणि अभ्यास यात खंड पडत नाही. 

  शिक्षक हा खरं तर केवळ पेशा नसून ती एक पॅशन असते, असं म्हटलं जातं. याचं मूर्तीमंत उदाहरण मध्यप्रदेशमध्ये दिसून आलंय. एखाद्या शिक्षकानं ठरवलं तर तो विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो, याचा आदर्शच या शिक्षकानं घालून दिलाय.

  मध्यप्रदेशमधील सगर तालुक्यातील सी.एच. श्रीवास्तव या शिक्षकांनी गरीब विद्यार्थ्यांच्या समस्यांचा अभ्यास करून एक अनोखा उपक्रम सुरू केलाय. ग्रामीण भागात अनेकदा मोबाईलचा नेटवर्क नसतं. अनेक गरीब विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनही उपलब्ध नसतात. अशा परिस्थितीत गरीबांनी अभ्यास तरी कसा करावा, हा प्रश्न उपस्थित होतो. यावर श्रीवास्तव सरांनी उपाय शोधला.

  श्रीवास्तव सरांनी पदरचे पैसे खर्च करून स्वतःच्या स्कूटरवर एक वाचनालय उभं केलं आणि हे वाचनालय घेऊन तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये जायला सुरुवात केली. जिथं जिथं हे वाचनालय पोहोचतं, तिथले विद्यार्थी त्यांना हवं असणारं पुस्तक घेतात आणि अगोदर घेतलेली पुस्तकं जमा करतात. त्यामुळं विद्यार्थ्याना सतत नवनवी पुस्तकं मिळत राहतात आणि त्यांचं वाचन आणि अभ्यास यात खंड पडत नाही.

  केवळ एवढंच नव्हे, तर तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांत थांबून श्रीवास्तव सर मुलांचे वर्गदेखील घेतात. एका गावात ते आले की जिथं शक्य होईल, तिथं त्यांची शाळा भरते. मुलं सरांसमोर बसतात आणि सर त्यांना शिकवतात. शिकवून झाल्यावर अभ्यासही देतात आणि पुन्हा परत येईपर्यंत तो पूर्ण करण्याची सूचना विद्यार्थ्यांना देतात. श्रीवास्तव सरांच्या या कल्पनेचं सध्या चांगलंच कौतुक होतंय.

  गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात केवळ परिस्थितीमुळे आणि स्मार्टफोन नसल्यामुळे खंड पडू नये, या उद्देशानेच आपण हे काम सुरू केल्याची प्रतिक्रिया श्रीवास्तव सरांनी दिलीय. शिवाय स्वखर्चानं ५ स्मार्टफोन खरेदी करून त्यांनी ते विद्यार्थ्यांना दिले आहेत. त्यावरदेखील विद्यार्थ्यांचा अविरत अभ्यास सुरू असतो, असं त्यांनी म्हटलंय. अशा शिक्षकांमुळे या विद्यार्थ्यांचं भवितव्य नक्कीच उजळेल, यात शंका नाही.