कोरोनाकाळात मेजर आणि मॅजिस्ट्रेटचा अनोखा विवाह सोहळा

भोपाळमधील सिटी मॅजिस्ट्रेट शिवांगी जोशी यांचा विवाह आर्मीमध्ये मेजर पदावर कार्यरत असणाऱ्या अनिकेत चतुर्वेदी यांच्याशी ठरला होता. दोन वर्षांपूर्वीच दोघांच्या घरच्यांच्या संमतीने हे लग्न निश्चित झाले. मात्र काही ना काही कारणामुळे हे लग्न पुढे ढकलले जात होते. त्यात कोरोना संकटामुळे लग्न कसे करायचे, हा देखील प्रश्न होताच. अखेर या शिवांगी आणि मेजर अनिकेत यांनी एकत्र बसून यावर तोडगा काढला आणि नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला.

  भोपाळ : एखाद्या राजकीय नेत्यांचं किंवा बड्या सरकारी अधिकाऱ्याचे लग्न आणि बडेजाव हे भारतीय समाजातील सूत्र दोन बड्या अधिकाऱ्यांनी मोडून काढले आहे. बँड, बाजा किंवा इतर कुठलाही बडेजाव न करता एका सिटी मॅजिस्ट्रेटचे सैन्यातील मेजरसोबत लग्न झाले. हार आणि मिठाई यांच्या खरेदीसह केवळ 500 रुपयांत हा लग्नसोहळा पार पडला.

  असा घेतला निर्णय

  भोपाळमधील सिटी मॅजिस्ट्रेट शिवांगी जोशी यांचा विवाह आर्मीमध्ये मेजर पदावर कार्यरत असणाऱ्या अनिकेत चतुर्वेदी यांच्याशी ठरला होता. दोन वर्षांपूर्वीच दोघांच्या घरच्यांच्या संमतीने हे लग्न निश्चित झाले. मात्र काही ना काही कारणामुळे हे लग्न पुढे ढकलले जात होते. त्यात कोरोना संकटामुळे लग्न कसे करायचे, हा देखील प्रश्न होताच. अखेर या शिवांगी आणि मेजर अनिकेत यांनी एकत्र बसून यावर तोडगा काढला आणि नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला.

  घरच्यांनाही केले तयार

  कोरोना काळात गर्दी जमवणे अयोग्य असून केवळ मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा हा निर्णय दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांना सांगितला आणि त्यांची सहमती मिळवली. त्यानंतर केवळ फुलांचे दोन हार आणि मिठाईचे दोन पुडे एवढीच ‘शॉपिंग’ करत दोघे विवाहबंधनात अडकले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न झाल्यानंतर दोघेही कोर्टात गेले आणि तिथे आपल्या लग्नाची नोंदणी केली.

  ठेवला नवा आदर्श

  या दोघांनीही साध्या पद्धतीने विवाह करून समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. कोरोना काळात विवाह सोहळ्यातील उपस्थितीवर सरकारने बंधने घातली आहेत. तरीही अनेकजण ही बंधने झुगारून मोठमोठे विवाहसोहळे करताना दिसतात. या दोघांनी मात्र आपल्या कृतीतून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.