आदिवासींसाठी स्वतंत्र धार्मिक संहिता लागू करण्यात यावी आणि पुढील जनगणनेत त्या संहितेनुसार आदिवसींची जनगणना कऱण्यात यावी, अशी मागणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकारकडे केलीय. आदिवासी हे हिंदू नाहीत, असा दावा करताना पुढील जनगणनेत आदिवासींना हिंदू धर्मात गणले जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केलीय. त्यामुळे यावरून जोरदार वाद रंगण्याची चिन्हं आहेत.
आदिवासींचा धर्म कुठला, या मुद्द्यावरून एक नवा वाद देशात उभा राहताना दिसत आहे. आदिवासींचा मूळ धर्म हिंदू नाही, असा दावा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केलाय. सोरेन यांच्या या वक्तव्यानंतर यावरून उलटसुलट चर्चा सुरू झालीय.
आदिवासींसाठी स्वतंत्र धार्मिक संहिता लागू करण्यात यावी आणि पुढील जनगणनेत त्या संहितेनुसार आदिवसींची जनगणना कऱण्यात यावी, अशी मागणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकारकडे केलीय. आदिवासी हे हिंदू नाहीत, असा दावा करताना पुढील जनगणनेत आदिवासींना हिंदू धर्मात गणले जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केलीय. त्यामुळे यावरून जोरदार वाद रंगण्याची चिन्हं आहेत.
हेमंत सोरेन यांच्या या विधानावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली असून सोरेन हे व्हॅटिकनच्या हातातील बाहुले झाल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिलीय. हॉवर्ड इंडिया कॉन्फरन्सदरम्यान सोरेन यांनी हे मत व्यक्त केलंय. ही परिषद ऑनलाईन आय़ोजित करण्यात आली होती. या परिषदेत आदिवासींच्या धर्माबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री सोरेन बोलत होते.
आदिवासी कधीही हिंदू नव्हते. ते हिंदू असल्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. आदिवासी हे निसर्गाची उपासना करतात. त्यांचे रितीरिवाज हिंदू धर्मियांपेक्षा वेगळे आहेत. ते तेव्हाही हिंदू नव्हते आणि आताही हिंदू नाहीत. वर्षानुवर्षं आदिवासींवर अन्याय होत राहिला, असं मत सोरेन यांनी व्यक्त केलं.
आंतरराष्ट्रीय मंचावर अशा प्रकारची विधानं करून आपण व्हॅटिकनच्या हातचे बाहुले असल्याचं मुख्यमंत्री सोरेन सिद्ध करत असल्याची टीका भाजपनं केलीय. आपल्याकडे विधीमंडळ आणि न्यायपालिका असताना सोरेन आंतरराष्ट्रीय मंचावर याचा फैसला करण्याचा का प्रयत्न करत आहेत, असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय.
तर काँग्रेसनं याबाबत काहीच प्रतिक्रिया न देणं पसंत केलंय. सोरेन काय म्हणाले ते आपण ऐकलं नसल्याचं झारखंडच्या काँग्रेस प्रवक्त्यांनी सांगितलंय.