Mamata Banerjee

गेल्या एका सभेत ममता बॅनर्जी (mamata banerjee)यांनी चंडीपाठ म्हणून दाखवला होता. तर, मंगळवारी झालेल्या बांकुरा येथील रॅलीत ममता बॅनर्जी यांनी दुर्गापाठ म्हणून दाखवला.

  कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा(west bengal election) निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(mamata banerjee) यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असताना त्यांनी बंकुरा येथील सभेला व्हीलचेअरवरून उपस्थिती लावली. गेल्या एका सभेत ममता बॅनर्जी यांनी चंडीपाठ म्हणून दाखवला होता. तर, मंगळवारी झालेल्या बांकुरा येथील रॅलीत ममता बॅनर्जी यांनी दुर्गापाठ म्हणून दाखवला. तसेच त्यांनी मोदी व शाह यांच्यावर जोरदार टीका केली.पैसे देऊन लोकांना सभेला आणले जातेय, असा आरोप केला आहे.

  …पण मत तृणमूलला द्या
  भाजपाच्या रॅलीत कोणीही जायला तयार नाही. म्हणूनच भाजपकडून पैसे देऊन लोकांना सभेला आणले जात आहे, असा दावा करत पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांनी बंगाल निवडणुकांपेक्षा देशाकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे, असा टोला लगावला. भाजपकडून पैसे वाटले जात असल्यास ते घ्या. पण मत मात्र तृणमूल काँग्रेसला द्या, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

  हा नवीन भारत
  ममतांना विरोध करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. अनेक मोठे नेते, मुख्यमंत्री बंगालमध्ये प्रचारात जोर लावत आहेत. मंगळवारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुरुलिया येथील रॅलीला संबोधित केले. त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, ममता दीदी जय श्रीरामच्या नाऱ्यावर चिडतात. २०१४ पूर्वी लोक मंदिरात जाण्यास भीत होते, आता ममता दीदी मंदिरात जाऊन चंडीपाठ करीत आहेत, हा नवीन भारत आहे.

  लोकजनशक्तीचे उमेदवार घोषित
  लोकजनशक्ती पार्टीदेखील (लोजपा) बंगालमधील निवडणूक मैदानात उतरली आहे. पार्टीकडून निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलवी आहे. पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष मीरा चक्रवर्ती व बंगालचे पर्यावेक्षक तसेच खासदार चौधरी महबूब अली कैसर यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. लोकजनशक्ती ममतांच्या नेतृत्वाखालील टीएमसी सरकारला बंगालमध्ये आपल्या दमवर हटविण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष मीरा चक्रवर्ती यांनी यावेळी सांगितले.