कोरोना आणि ब्लॅक फंगसनंतर रुग्णांना होतोय ‘हा’ दुर्मिळ आजार, डायरेक्ट जबडाच सडतो

भोपाळच्या(Bhopal) हमीदिया रुग्णालयात ऑस्टिओमोलाइटिसची(Osteomyelitis) २० पेक्षा जास्त प्रकरणं आढळून आली आहे. त्यापैकी कित्येकांचे जबडे काढून टाकावे लागले आहेत.

    भोपाळ : आधी कोरोना(Corona), त्यातून बरं झाल्यावर ब्लॅक फंगस आणि आता ब्लॅक फंगसमधूनही (Black fungus) बरं झालेल्या रुग्णांना ऑस्टियोमोलाइटिस बळावला आहे. हा दुर्मिळ असा आजार आहे. यामुळे रुग्णांचा तोंडाच्या आतील वरील भाग आणि जबड्याची हाडं सडू लागली आहे. या ऑस्टिओमोलाइटिस (Osteomyelitis) असं म्हटलं जातं.

    भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात ऑस्टिओमोलाइटिसची २० पेक्षा जास्त प्रकरणं आढळून आली आहे. त्यापैकी कित्येकांचे जबडे काढून टाकावे लागले आहेत.

    ब्लॅक फंगसमुळे रुग्णाच्या तोंडाच्या आतील वरील भाग आणि जबड्यांच्या रक्तपेशींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. यामुळे हाडांपर्यंत जाणारा रक्तपुरवठा खंडित होतो मग हाडं सडू लागतात. सडलेली हाडं ऑपरेशन करून काढावी लागतात. तोंडाच्या वरील भाग, जबडाही काढून टाकावा लागतो. रुग्णांना खाण्यापिण्यातही त्रास होतो.

    जबड्याच्या वरील भागात सूज, दात अचानक हलू लागणं, दातांमध्ये वेदना, हिरड्यांमधून पू येणं सोबतच पांढरे पुरळ येणं. वरील ओठ बधीर होणं. तोंडाच्या आत वरील भागाची त्वचा सडू लागल्याने ती गळू लागते.

    डॉक्टरांनी सांगितलं, हा नवा आजार नाही. पण कित्येक वर्षात याची एक-दोन प्रकरणंच पाहायला मिळायची. अचानक ब्लॅक फंगसची प्रकरणं वाढली आणि सोबतच या आजाराच्या प्रमाणातही वाढ होते आहे.

    हमीदियातील दंतरोग विभागाचे अध्यक्ष डॉ. अनुज भार्गव यांनी सांगितलं की, हा आजार गेल्या ५० वर्षांत एक हजारांपैकी फक्त ०.१४ लोकांना व्हाययचा. आता या आजाराची प्रकरणं वेगाने समोर येत आहेत आणि याचं मुख्य कारण म्हणजे ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णांचं वाढलेलं प्रमाण. कित्येकांच्या तोंडाच्या आतील वरील भाग आणि जबडा कापून वेगळा करावा लागत आहे. हमीदियामध्ये काही दिवसांतच ऑस्टियोमोलाइटिसग्रस्त १० पेक्षा जास्त रुग्णांचं ऑपरेशन करण्यात आलं आहे.