भाच्याची बाईक अडवल्याच्या रागातून आमदाराने हेड कॉन्स्टेबलच्या कानाखाली काढला जाळ ; वाचा काय आहे प्रकरण

पोलिसांनी बाईक थांबवताच सुनील बारियाला राग आला आणि तो पोलिसांची कॉलर पकडून त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देऊ लागला. यामुळे हेड कॉन्स्टेबलने त्याला दंड ठोठावला आहे.

    नवी दिल्ली: राजकीय नेत्यांकडून अनेकदा सत्तेचा दुरुउपयोग केला जातो. असाच काहीसा प्रकार राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड येथे समोर आला आहे. महिला आमदाराने भाच्याची बाईक थांबवून त्याला दंड ठोठावल्याचं रागातून हेड कॉन्स्टेबलला (Head Constable) कानशिलात लगावत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला आमदारावर गुन्हा दाखल केला आहे.

    महिला आमदार रमिला खरिया यांना आपल्या भाच्याला अडवून दंड ठोठावल्याचा राग आला आणि त्यांनी कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली. महेंद्र नाथ सिंह असं या हेड कॉन्स्टेबलचं नाव असून त्यांनी महिला आमदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हेड कॉन्स्टेबल महेंद्र नाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकाबंदी असल्याने बाईकवरुन जात असलेल्या सुनील बारिया याला पोलिसांनी अडवलं.

    कोरोनामुळे प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चौकशी केली जात आहे. मात्र पोलिसांनी बाईक थांबवताच सुनील बारियाला राग आला आणि तो पोलिसांची कॉलर पकडून त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देऊ लागला. यामुळे हेड कॉन्स्टेबलने त्याला दंड ठोठावला आहे. याची तक्रार सुनीलने आमदार रमिला खरिया यांच्याकडे केली. यानंतर संतापलेल्या महिला आमदाराने कॉन्स्टेबलच्या कानशिलात लगावली आहे.

    महेंद्र नाथ यांनी या प्रकरणी आमदारावर गुन्हा नोंदवण्याविषयी बोलले असता स्टेशन प्रभारी प्रदीप कुमार यांनी त्यांना महिला आमदाराची माफी मागण्यास सांगितले आहे. यावर महेंद्र यांनी नकार दिला. नंतर इतर पोलीस महेंद्रच्या समर्थनार्थ उभे राहिले आणि संपावर गेले तसंच त्यांनी जेवण करण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी आमदाराविरोधात गुन्हा दाखल करून घेतला.