approved for hearing petition regarding land of sri krishnas birthplace in mathura district court
श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद अखेर न्यायालयात, मुथरा जिल्हा न्यायालयाला घ्यावा लागला 'हा' निर्णय

रामजन्मभूमीचा (Ram Janmbhumi) वाद मिटल्यानंतर आता मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमीचा (Krishna Janmbhumi) वाद अखेर न्यायालयात गेला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागेच्या मालकी हक्काविषयीचा हा वाद आहे. या आधी दिवाणी न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. त्याला मथुरा जिल्हा न्यायालयात आव्हान दिलं होतं.

मथुरा : रामजन्मभूमीचा (Ram Janmbhumi) वाद मिटल्यानंतर आता मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमीचा (Krishna Janmbhumi) वाद अखेर न्यायालयात गेला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागेच्या मालकी हक्काविषयीचा हा वाद आहे. या आधी दिवाणी न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती. त्याला मथुरा जिल्हा न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर न्यायालयाने जागेच्या मालकीबाबतची याचिका शुक्रवारी दाखल करून घेतली असं वृत्त ‘आज तक’ ने दिलं आहे. या प्रकरणी न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्ड आणि ईदगाह मशिद ट्रस्ट यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

याचिकेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीच्या १३.३७ एकर जागेची मालकी मागण्यात आली असून शाही ईदगाह मशीद हटविण्याची मागणी केली आहे. श्रीकृष्ण विराजमान सहीत ८ जणांनी याचिका दाखल केली आहे. या आधी भगवान कृष्ण विराजमान, कटरा केशव देव खेवाट, मथुरा बाजार शहर येथील जागेसाठी याचिकाकर्त्या रंजना अग्निहोत्री आणि इतर सहा भाविकांनी ही याचिका दाखल केली होती.

श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागेवर मुघलकाळात कब्जा करण्यात आला होता. नंतर या जागेवर शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली होती. आता याच जागेवरील शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. मात्र न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती.

असा आहे जांगडगुत्ता ?

या आधीच्या याचिकेत माहिती देण्यात आली होती की, औरंगजेबानं १६६९-७० मध्ये श्रीकृष्णाच्या जन्माचं श्रीकृष्ण मंदिर कटरा केशवदेव पाडले आणि त्या ठिकाणी एक इमारत बांधण्यात आली. नंतर या इमारतीस ईदगाह मशीद असं संबोधलं गेलं. १०० वर्षांनंतर मराठ्यांनी गोवर्धनची लढाई जिंकली आणि आग्रा व मथुराच्या संपूर्ण प्रांताचे ते राज्यकर्ते झाले यानंतर मराठ्यांनी मशिदीची तथाकथित रचना पाडून टाकल्यानंतर कटरा केशवदेव येथे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान विकसित केलं आणि त्याचे नूतनीकरणही केले.

१८०३ मध्ये इंग्रजांनी मथुरा ताब्यात घेतल्यानंतर या जागेवर कोणताही बदल करण्यात आला नाही. ब्रिटिशांनी १८१५ मध्ये १३.३७ एकर जागेचा लिलाव करत बनारसचा राजा पाटणी मल यांना ती जमीन विकली. ते या जमिनीचे मालक झाले, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.

रंजना अग्निहोत्री यांच्यामार्फत दाखल केलेला याचिकेत उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाचे सदस्य, ट्रस्ट मशीद ईदगाह किंवा मुस्लिम समाजातील कोणत्याही सदस्याला कटरा केशव देव यांच्या मालमत्तेत रस किंवा अधिकार नाही, असा दावा करण्यात आला होता.

१९२१ मध्ये काही मुस्लिमांनी जमिनीवर मालकी हक्क सांगणारी याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळून लावली. फेब्रुवारी १९४४मध्ये राजा पाटणी मल यांच्या वारसदारांनी ही जमीन पंडित मदनमोहन मालवीय, गोस्वामी गणेश दत्त आणि भिकण लालजी अत्रे यांना १९ हजार ४०० रुपयांना विकली. मात्र, ऑक्टोबर १९६८ मध्ये श्री कृष्णा जन्मभूमी सेवा संघ आणि शाही मशीद ईदगाह सोसायटी यांच्यात या जागेचा मालकी नसतानाही करार झाला.

जुलै १९७३ मध्ये मथुरा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या कराराच्या आधारे प्रलंबित खटल्याचा निर्णय घेतला होता. सध्या असलेल्या संरचनांमध्ये बदल करण्यास मनाई केली होती.