भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा, कुत्र्याला चपाती बनवण्यासाठी बहिणीने नकार देताच भावाने उचलले टोकाचे पाऊल

कुत्र्याला चपाती बनवण्यासाठी बहिणीने नकार देताच भावाने गोळी मारून तिची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मेरठमध्ये काल सोमवारी घडली.

उत्तरप्रदेश : भाऊ-बहीण म्हटलं की नात्याला गोडवा आणि प्रेमळ भावना आल्या. परंतु त्याच नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक गोष्ट उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh)  समोर आली आहे. कुत्र्याला चपाती बनवण्यासाठी बहिणीने नकार देताच भावाने गोळी मारून तिची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये काल सोमवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमध्ये कैलाश वाटिका कॉलनीमध्ये योगेंद्र कुमार एक बिल्डर आहे. तो आपली आई, बहीण पारूल आणि छोटा भाऊ आशिष यांच्यासोबत राहतो. आशिष जवळ २० पेक्षा जास्त कुत्रे आहेत. त्यामुळे या कुत्र्यांसाठी त्याची बहीण पारूल दररोज चपाती बनवत होती. परंतु काल सोमवारी पारूलने कुत्र्यांसाठी चपाती बनवण्यास नकार दिला. त्यामुळे आशिषने रागाच्या भरात तिच्यावर गोळीबार करून तिची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ७.३० च्या दरम्यान योगेंद्रचा छोटा भाऊ आशिषने कुत्र्यांसाठी चपाती बनविण्यास सांगितली होती. परंतु पारूलने नकार दिल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर रात्री ८.०० वाजताच्या सुमारास आशिषने बंदूकीच्या सहाय्याने तिच्या डोक्यात आणि छातीत गोळी झाडली. या हत्येनंतर पारूलने जागेवरच श्वास सोडला.

आरोपीने सिद्ध केला गुन्हा

घटनेच्या वेळी योगेंद्र दिल्लीत होता आणि त्याची आई घरी होती. गोळीचा आवाज ऐकून कुटुंब व आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता आशिषला अटक करण्यात आली आहे. आरोपीला कसलाही पश्चाताप झाला नसून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.