त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याने एका पत्रकाराला मारहाण

बंगाली वर्तमानपत्राचे पत्रकार पाराशर बिस्वास(parashar biswas) यांना कोरोनाची लागण झाली होती. कोव्हिड केअर सेंटरमधून बरे झाल्यावर त्यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यावर टीका करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता.

त्रिपुराचे(tripura) मुख्यमंत्री बिप्लव देव(biplav dev) यांच्याविरोधात एक फेसबुक पोस्ट लिहिल्याबद्दल एका पत्रकारावर हल्ला करण्यात आला आहे. या पत्रकाराने बिप्लव देव यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर टाकला होता. त्यानंतर अज्ञातांनी या पत्रकाराला मारहाण केली आहे. जखमी झालेल्या पत्रकारावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. हल्ला कोणी केला याचा तपास पोलीस करत आहेत.

त्रिपुरामध्ये  माध्यमांनी कोरोना काळातील गैरसोयीबाबत बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्यावर बिप्लव देव यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच माध्यमांना माफ करणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर एका पत्रकाराने बिप्लव देव यांच्यावर टीका केली.

बंगाली वर्तमानपत्राचे पत्रकार पाराशर बिस्वास(parashar biswas) यांना कोरोनाची लागण झाली होती. कोव्हिड केअर सेंटरमधून बरे झाल्यावर त्यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यावर टीका करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. पत्रकारांना मुख्यमंत्र्यांनी धमकावू नये. मी आज हा व्हिडिओ पोस्ट केला आहे पुढेही करेन, असे बिस्वास म्हणाले. त्यानंतर शनिवारी बिस्वास यांच्या घरामध्ये घुसून अज्ञातांनी हल्ला(attack) केला. आगरतळामधील रुग्णालयात बिस्वास यांना दाखल करण्यात आले आहे.

पत्रकार सुबल डे यांच्या मते, भाजपा कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलेला असू शकतो. दुसरीकडे त्रिपुराचे भाजपा प्रवक्ते नंबेदु भट्टाचार्य यांनी हा आरोप खोटा असल्याचे सांगत या घटनेचा निषेध केला आहे.