कर्नाटकला लाभले नवे मुख्यमंत्री, धर्मेंद्र प्रधान यांची मोठी घोषणा ; उद्या पार पडणार शपथविधी

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई यांची निवड करण्यात आली असून उद्या २८ जुलै (बुधवार) दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राज्याचे गृहमंत्री बसवराज आता उद्यापासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळणार आहेत.

  बंगळुरु :  मागील दोन महिन्यांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असणाऱ्या राजकीय नाट्यानंतर कर्नाटकला नवे मुख्यमंत्री लाभले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी काल राजीनामा दिल्यानंतर आज त्यांची जागी बसवराज बोम्मई (Basavaraj S Bommai) यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री आणि निरीक्षक धर्मेंद्र प्रधान यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

  कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई यांची निवड करण्यात आली असून उद्या २८ जुलै (बुधवार) दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राज्याचे गृहमंत्री बसवराज आता उद्यापासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळणार आहेत.

  बसवराज बोम्मई नेमके कोण आहेत?

  बसवराज बोम्मई हे बी.एस. येडियुरप्पा यांच्यासारखेच ताकदवान लिंगायत नेते आहेत. ते येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, येडियुरप्पा यांनी लिंगायत समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करु नये, असं म्हटलं होतं. बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस आर बोम्मई यांचे पुत्र आहेत. बोम्मई यांनी जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

  राजीनामा देताना काय म्हणाले येडियुरप्पा?

  कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे, अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या आहेत.

  येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे आहेत. हा समाज १९९० पासून भाजपचा समर्थक आहे. कर्नाटकमध्ये लिंगायत समाज १७ टक्के आहे. विधानसभेच्या २२४ पैकी जवळपास ९० ते १०० जागांवर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे.

  तुम्हाला कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत काय वाटते ? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…