…अरे माझ्या कोंबड्या? क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला बर्ड फ्लूचा फटका

पोल्ट्रीमधील काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नमूने भोपाळमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बर्ड फ्लूमुळेच हे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

देशभरासह राज्यातील काही भागांत बर्ड फ्लूने थैमान घातलं आहे. तसेच बर्ड फ्लूचा वेगाने प्रसार होत असून त्याचा फटका आता भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीलाही बसला आहे. कडकनाथ कोंबड्यांसह कुक्कुट पालनात पाऊल टाकणाऱ्या धोनीला त्याच्याकडे असणाऱ्या २५०० कडकनाथ कोंबड्या नष्ट कराव्या लागणार आहेत. या कोंबड्या आज बुधवारी झाबुआमध्ये ठार करण्यात येणार आहे. या कोंबड्यांच्या पिल्लांबरोबर ठेवण्यात आलेल्या काही पिल्लांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळल्याने ही करावाई करण्यात येणार आहे.

पोल्ट्रीमधील काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नमूने भोपाळमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बर्ड फ्लूमुळेच हे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अधिक पौष्टीक आणि आरोग्यदायी मांसांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या कोंबड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांवरही बर्ड फ्लूमुळे नवे संकट ओढावले आहे. कडकनाथ कोंबड्या मारल्या जाणार असल्याच्या वृत्ताला झाबुआमधील कडकनाथ कोंबड्यांच्या पोल्ट्री मालकांनी दुजोरा दिला आहे.

थांदलामधील रुंडीपाडा गावातील कडकनाथ कुकुटपालन क्षेत्रामधील अनेक कोंबड्या मागील काही दिवसांमध्ये मरण पावल्यानंतर बर्ड फ्लूची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर चाचणीसाठी या कोंबड्यांचे नमुने पाटवण्यात आले असता त्यामध्ये एच फाइव्ह एन वन विषाणू आढळून आला.