सरकार पाडण्यासाठी भाजपचा प्रयत्न

राजस्थानमध्ये विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीकडून अशोक गेहलोत यांचे सरकार पाडण्यासाठी घोडेबाजाराचा प्रयत्न सुरु होता, असा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसच्या २४ आमदारांनी केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आम्ही त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असे या आमदारांनी म्हटले आहे.या प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. भाजपच्या २ नेत्यांना अटकही झाली आहे.

 अशोक गेहलोत यांनी काल जयपूरमध्ये असे सांगितले की, सध्या कोरोनावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. ते आम्ही करतोय. भाजप सरकार अस्थिर करण्याच्या मागे आहे. वाजपेयींच्या काळात असं घडत नसे. मात्र २०१४ नंतर धर्मावर आधारित फूट पाडणे अभिमानाची बाब मानली जात आहे. कोरोनाच्या भीषण काळात भाजप नेत्यांनी मानवता धाब्यावर बसवली आहे. सरकार पाडण्यासाठी आमदार खरेदी करण्याचे प्रयत्न होत आहेत.  सतीश पुनिया, गुलाबचंद कटारिया आणि राजेंद्र राठोड यांचं नाव गेहलोत यांनी घेतल. तसेच हे लोक केंद्रीय नेत्यांच्या इशाऱ्यावर खेळ करत असल्याचे गेहलोत यांनी म्हटले आहे.  त्यांचे हे खेळ लोकांसमोर आलेले नाहीत.

दरम्यान, गेहलोत स्वत:च्या अपयशाचे खापर भाजपवर फोडत असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.