Mamata Banerjee

दिल्ली :  बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड खालसा करण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशातील मोठे नेते आणि पक्ष संघटनेला ‘मिशन बंगाल’साठी कामाला लागा, असे निर्देश दिले आहे. उत्तर प्रदेशातील भाजपा नेते आणि पक्ष संघटनेवर 2021 मध्ये होऊ घातलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मदार सोपविण्यात आली आहे. भाजपाने ममतांचा गड खालसा करण्यासाठी ठोस रणनीती आखली असून त्यावर कामही सुरू केले आहे.

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य आणि पक्षाचे उत्तरप्रदेश महासचिव (संघटन) सुनील बंसल याच आठवड्याच्या अखेरीस पश्चिम बंगालमध्ये जाणार आहेत. त्यांच्यावर इतर राज्यांतील नेत्यांसोबतच कामाची जबाबदारी सोपविली जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील लवकरच बंगालच्या दौऱ्यावर जाऊ शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, देशभरातील भाजप नेत्यांवर ‘मिशन बंगाल’अंतर्गत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविल्या जाईल. बंगालमध्ये भाजपाने मासेमारी करणारे आणि मातुओ समाजातील मतदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. दलित आश्रयीतांचा एक समूह बांगलादेशात नावारुपास आला आहे, ज्याचा प्रभाव राज्यातील ५० विधानसभा मतदार संघावर पडू शकतो.

नरोत्तम मिश्रांनी फुंकले रणशिंग

बंगाल निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘स्पेशल 7’ मध्ये मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनाही जागा मिळाली आहे. यामुळे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधून बंगाल निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. भाजपच्या वादळात ममता बॅनर्जी वाळलेल्या पानासारख्या उडून जातील, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास टाकला असून यासाठी मी त्यांचा आभारी आहे. पक्षाने जो विश्वास माझ्यावर टाकला आहे, तो सार्थ करण्याचा प्रयत्न मी संपूर्ण ताकदीने करेन. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार वाळलेल्या पानासारखे उडून जाणार असून भाजपचे सरकार येथे स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राहुल, प्रियंका कधी येणार?

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या निवडणूक अभियानाचा सामना करण्याच्या प्रयत्नांतर्गत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा पुढील महिन्यात राज्यातील निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांनी याबाबतचे संकेत दिले आहे. राज्यात पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. काँग्रेसने बंगाल प्रभारीपदाची जबाबदारी प्रसाद यांच्यावर सोपविली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष डाव्यांसह आघाडी करून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपाचा सामना करणार आहे. प्रसाद यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी आणि पक्षातील इतर नेत्यांसोबत बैठकींचे सत्र सुरू केले आहे.

काँग्रेसने राज्यात डाव्या पक्षांसह संयुक्त आघाडी केली आहे. आम्ही डाव्यांसह मिळून तृणमूल काँग्रेस आणि भाजपाविरोधात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असे प्रसाद म्हणाले. काँग्रेसच्या तुलनेत निवडणूक अभियानात भाजपने आघाडी घेतली आहे, याबाबत बोलताना त्यांनी, दोन्ही पक्षांची कार्यपद्धती वेगवेगळी आहे, असे सांगितले. याचबरोबर, भाजपाकडे राज्यात कोणताही चेहरा नाही, यामुळेच त्यांचे केंद्रीय नेते राज्य पालथे घालत आहे. काँग्रेसकडे राज्यात कणखर नेतृत्व आहे, यामुळे केंद्रीय नेतृत्वाला आणण्याची गरज आम्हाला जाणवली नाही. मात्र, निवडणूक जवळच येऊन ठेपली आहे, यामुळे जानेवारी महिन्यात राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस समितीचे ज्येष्ठ नेते राज्यातील निवडणूक प्रचारात उतरतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.

ममतांना केजरींची साथ

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वीच केंद्र आणि राज्य सरकारमधील वादाने उग्र रूप धारण केले आहे. भाजपाध्यक्ष नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये उद्भवलेल्या आयपीएस अधिकारी वादात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची साथ मिळाली आहे. केजरीवाल यांनी ममतांचे समर्थन करीत केंद्रावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या प्रशासनात केंद्राकडून केला जात असलेला हस्तक्षेप पूर्णत: चुकीचा आहे. निवडणुकीपूर्वी राज्यांचे अधिकार संपविण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जात आहे. हे पाऊल उचलून केंद्र सरकारने संविधानाचे उल्लंखन केले असून त्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.