
दिल्ली : ओडिशातील परिवहन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एका विद्यार्थ्यासाठी थेट सरकारी बसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
विद्यार्थ्याला बसच्या वेळेमुळे रोज शाळेत जाण्यासाठी उशीर होत होता. त्यानंतर ओडिशाच्या परिवहन विभागाने विद्यार्थ्याच्या सोयीसाठी आपल्या बसच्या वेळेत योग्य तो बदल केला आहे. साई अन्वेश अमृतम प्रधान असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
खासकरून त्याच्यासाठी बसच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर एमबीएस पब्लिक शाळेतील साई अन्वेश अमृतम प्रधान नावाच्या एका विद्यार्थ्याने राज्य परिवहन विभागाकडे ट्विटर अकाऊंटवरून एक तक्रार केली आहे.
साईच्या शाळेत रिपोर्टिंगची वेळ सकाळी ७.३० ची आहे. मात्र, रूट क्रमांक १३ वर पहिली बस लिगींपूर येथून सकाळी ७.४० वाजता निघते. यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. यावर काहीतर उपाय केला तर खूप मदत होईल असे सांगितले आहे. साई अन्वेश याच्या या ट्विटला काही तासांतच आयपीएस अधिकारी अरूण बोथरा यांनी उत्तर दिले आहे.
‘प्रिय साई… ही बस तुमच्यासारख्या प्रवाशांमुळे चालते. सोमवारपासून आम्ही बसच्या वेळेत बदल करत आहोत. आता पहिली बस सकाळी ७.०० वाजता जाईल आणि तुला शाळेत जायला देखील उशीर होणार नाही’ असे अरूण बोथरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विभागाने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.