पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिला अन् वाघिणीने डाव साधला,‘त्या’ प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिल्याने एका वाघिणीने (Tigress killed Zoo Employee) ३५ वर्षीय कर्मचाऱ्यावर हल्ला केला. पौलाश करमाकर असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे.

  अरुणाचल प्रदेशमधील इटानगर(Itanagar) येथील बायोलॉजिकल पार्कमध्ये (Biological Park) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका वाघिणीने केलेल्या हल्ल्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू(Tigress killed zoo employee) झाला आहे. पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिल्याने एका वाघिणीने ३५ वर्षीय कर्मचाऱ्यावर हल्ला केला. पौलाश करमाकर असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे.

  आसाममधील लखीमपूर जिल्हातील दीकाईजुली येथील रहिवाशी असणाऱ्या पौलाश मंगळवारी वाघिणीच्या पिंजऱ्यातील पाण्याची जागा साफ करण्यासाठी गेला. त्यानंतर वाघिणीने त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख असणाऱ्या राया फ्लॅगो यांनी सांगितलं.

  करमाकर यांच्यावर हल्ला करणारी वाघीणचं नाव चिपी असं आहे. बंगाल टायगर प्रजातीची ही वाघीण आहे. २०१३ पासून ही वाघीण या प्राणीसंग्रहालयामध्ये आहे.

  फ्लॅगो म्हणाले, हा प्रकार मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडला. आमच्या येथील एका कर्मचाऱ्याने मला यासंदर्भातील माहिती दिली. तेव्हा मी, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत तातडीने त्या पिंजऱ्याजवळ गेलो. मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला. करमाकर यांचा मृतदेह वाघिणीच्या पिंजऱ्याजवळ पडला होता. वाघिणीने त्यांच्या चेहऱ्यावर हल्ला केला होता.

  ते पुढे म्हणाले की, पिंजऱ्याला तीन गेट आहेत. ती सर्व गेट एकाच वेळी सुरु राहिली. त्यामुळेच या वाघिणीने थेट कर्मचाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये चौकशी सुरु केली आहे.

  इटानगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कमदम सिकोम यांनी हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यूचं असल्याचं सांगितलं, गुन्हा नोंदवण्यात आला आहे. करमाकर यांचा मृतदेह आर. के. मिशन रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.