ममता बॅनर्जींच्या नातेवाईकांची सीबीआय चौकशी, कोळसा घोटाळ्यात हात काळे झाल्याचा आरोप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी याच्या घरी सीबीआयची टीम दाखल झाली. अभिषेक यांच्या पत्नी रुजिरा यांना सीबीआयनं नोटीस दिली. त्यानंतर सीबीआयचे अधिकारी रुजिरा यांची बहिण मेनका यांच्या घरी पोहोचले. मेनका यांच्या घराची सीबीआयनं दोन तास झडती घेतली. 

    पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीय. ममता बॅनर्जींच्या नातेवाईकांची नावं कोळसा घोटाळा प्रकरणात समोर येत असून सीबीआयनं चौकशीला सुरुवात केलीय.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी याच्या घरी सीबीआयची टीम दाखल झाली. अभिषेक यांच्या पत्नी रुजिरा यांना सीबीआयनं नोटीस दिली. त्यानंतर सीबीआयचे अधिकारी रुजिरा यांची बहिण मेनका यांच्या घरी पोहोचले. मेनका यांच्या घराची सीबीआयनं दोन तास झडती घेतली.

    दबावाला बळी पडणार नाही – अभिषेक

    अभिषेक बॅनर्जी यांनी आपण सीबीआयच्या दबावाला बिलकूल बळी पडणार नसल्याचं म्हटलंय. निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार करून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र अशा दबावाला आपण घाबरणार नसून भाजपविरोधात पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरू, असा इशारा अभिषेक यांनी दिलाय.

    सीबीआय आणि ईडी हेच भाजपचे मित्रपक्ष

    भाजपला सध्या कुणीही मित्रपक्ष नसून जुने मित्रपक्ष सोडून जात आहेत. सध्या सीबीआय आणि ईडी हेच भाजपचे मित्रपक्ष आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे नोटीस दिली जाणे, हे अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण असल्याची टीका तृणमूल काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलीय. केंद्र सरकार सरकारी यंत्रणांचा उपयोग राजकीय विरोधकांची प्रतिमा हनन करण्यासाठी करत असल्याचा दावा टीएमसीनं केलाय. तर हे जुनंच प्रकरण असून सीबीआय पूर्वीपासून याचा तपास करत असल्याचं स्पष्टीकरण भाजपनं दिलंय.