chandani railway station collapsed

वेगाने जाणाऱ्या ट्रेनमुळे हादरा बसून चांदनी रेल्वे स्थानकाची बिल्डिंग(Chandani Railway Station Building Collapsed) कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

    मध्य प्रदेशमधील हुरहानपुरमध्ये बुधवारी एक विचित्र दुर्घटना घडली. वेगाने जाणाऱ्या ट्रेनमुळे हादरा बसून चांदनी रेल्वे स्थानकाची बिल्डिंग(Chandani Railway Station Building Collapsed) कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र या दुर्घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

    ही घटना नेपानगर ते असीगढदरम्यान घडली. पुष्पक एक्सप्रेस ट्रेन ताशी ११० किलोमीटर वेगाने रेल्वे स्थानकामधून गेली. त्यानंतर ही ट्रेन जंगली भागामध्ये असणाऱ्या चांदनी रेल्वे स्थानकासमोरुन वेगाने जात असताना चांदनी रेल्वे स्थानकाची इमारत ट्रेनच्या वेगामुळे निर्माण झालेल्या हादऱ्याने कोसळली. रुळांना लागून असणारा इमारतीचा भाग प्लॅटफॉर्मवर कोसळला.

    साधारण ११० किमी वेगाने गेलेल्या ट्रेनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हादरा बसला की स्थानक अधिक्षक कक्षाच्या खिडकांच्या काचा फुटल्या. रेल्वे स्थानकातील बोर्ड खाली पडले आणि क्षणभरामध्ये प्लॅटफॉर्मवर इमारतीच्या अवशेषांचा ढीगारा पडला.

    या ठिकाणी गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी तैनात असणारे एएसएम प्रदीप कुमार यांनी  हे सगळं बघितलं. इमारत पडू लागल्याचं लक्षात आल्यानंतर कुमार यांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने भुसावळ एडीआरएम मनोज सिंहा, खंडवा एडीएन अजय सिंह आणि वरिष्ठ डीएन राजेश चिकळे यांना यासंदर्भातील माहिती दिली.

    रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि नक्की काय घडलं याची माहिती घेतली. या ठिकाणी भुसावळ, खंडवा, बुरहानपुरच्या आरपीएफ आणि जीआरपी जवानांना तैनात करण्यात आलं. या घटनेनंतर पुष्पक एक्सप्रेसला एक तास थांबवून ठेवण्यात आलं. इतर गाड्यांचे वेळापत्रकही यामुळे कोलमडलं आणि गाड्या ३० मिनिटं उशीराने धावत होत्या.

    भुसावळचे डीआरएम विवेक कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानकाच्या इमारतीचा छप्पराचा भाग बडला आहे. दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे.