छत्तीसगडने मोदींचा फोटो हटवला; मुख्यमंत्र्यांचा फोटो झळकणार

छत्तीसगड सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला आहे. राज्यात कोरोना लस घेणाऱ्यांना आता मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे छायाचित्र असलेले प्रमाणपत्र दिले जात आहे. आतापर्यंत त्यावर पंतप्रधान मोदींचा फोटो असायचा. दोन दिवसांपूर्वी झारखंड सरकारने मोदी यांचा फोटो हटवून, 'झारखंड मुक्ती मोर्चा'चे प्रमुख आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे छायाचित्र असलेले प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला होता. त्या मागोमाग आता छत्तीसगडमध्येही हा बदल करण्यात आला आहे.

    दिल्ली : छत्तीसगड सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला आहे. राज्यात कोरोना लस घेणाऱ्यांना आता मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे छायाचित्र असलेले प्रमाणपत्र दिले जात आहे. आतापर्यंत त्यावर पंतप्रधान मोदींचा फोटो असायचा. दोन दिवसांपूर्वी झारखंड सरकारने मोदी यांचा फोटो हटवून, ‘झारखंड मुक्ती मोर्चा’चे प्रमुख आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे छायाचित्र असलेले प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला होता. त्या मागोमाग आता छत्तीसगडमध्येही हा बदल करण्यात आला आहे.

    छत्तीसगड सरकारने तरुणांच्या लसीकरणासाठी नवी राज्यस्तरीय वेबसाईट सुरू केली आहे. देशभारत लस घेण्यासाठी जारी करण्यात आलेल्या ‘कोविन’ अॅपऐवजी 18 ते 44 या वयोगटाने लसीकरणासाठी CGTEEKA या वेबसाईटवर नावनोंदणी करण्याचे आवाहन छत्तीसगड सरकारकडून करण्यात आले आहे. या अॅप किंवा वेबसाईटवरून लसीकरण मोहिमेत सहभागी झालेल्या नागरिकांना मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या फोटोसहीत प्रमाणपत्र दिले जात आहे.

    छत्तीसगड सरकारच्या या निर्णयावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. आपात्कालीन परिस्थितीतही काँग्रेस प्रचाराची एकही संधी सोडत नाही आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेले प्रमाणपत्र वाटले जात आहेत, अशी टीका भाजपाकडून केली जात आहे. भाजपाच्या या टीकेवर छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टी.एस. सिंहदेव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये चुकीचे काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारकडून ज्यांना लस दिली जाते त्यांच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचाच फोटो आहे. परंतु, 18 ते 44 या वयोगटासाठी जी लस राज्य सरकारकडून खरेदी केली जात आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांचा फोटो असेल तर आक्षेप का घेण्यात येत आहे? असा प्रश्न सिंहदेव यांनी उपस्थित केला आहे.