इथे चोरी होऊन गेली आहे, चोरांनी पुन्हा कष्ट घेऊ नयेत, या शहरातल्या लोकांनी हतबल होऊन लावल्या पाट्या

रांचीतील पुनदाग ओपी परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. रोज कुठल्या ना कुठल्या घरात चोरी होत आहे. पोलीस तक्रार केल्यानंतर ना झालेल्या चोरीचा तपास लागलाय, ना नव्या चोऱ्या थांबल्यात. त्यामुळे करावं तरी काय, या हतबलतेतून नागरिकांनी आता चोरांनाच आवाहन करणाऱ्या पाट्या घराबाहेर लावल्या आहेत. 

    माणूस जेव्हा परिस्थितीनं हतबल होतो, तेव्हा तो काय करू शकतो, याचं उदाहरण सध्या रांचीमधील एका परिसरात दिसून येतंय. रांचीमध्ये सध्या चोरांनी उच्छाद मांडलाय. सतत कुठल्या ना कुठल्या घरात चोऱ्या होतायत. याने वैतागलेल्या नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्यात. मात्र त्याचा काहीच उपयोग नसल्याचं लक्षात आलंय.

    रांचीतील पुनदाग ओपी परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. रोज कुठल्या ना कुठल्या घरात चोरी होत आहे. पोलीस तक्रार केल्यानंतर ना झालेल्या चोरीचा तपास लागलाय, ना नव्या चोऱ्या थांबल्यात. त्यामुळे करावं तरी काय, या हतबलतेतून नागरिकांनी आता चोरांनाच आवाहन करणाऱ्या पाट्या घराबाहेर लावल्या आहेत.

    ‘या घरात अगोदरच चोरी झालीय. पुन्हा प्रयत्न करून आपला वेळ वाया घालवू नये’, असा पाट्या नागरिकांनी घराबाहेर लावायला सुरुवात केलीय. या भागात केवळ रात्रीच नव्हे, तर अगदी दिवसाढवळ्याही चोऱ्या होत आहेत. त्यामुळे घरातून बाहेर जाणंही नागरिक टाळत आहेत. घरमालक असो किंवा भाडेकरू, सतत कुणी ना कुणी घरात असेल, याची खबरदारी घेत आहे. घराला कुलूप लावून अख्ख्या कुटुंबाने बाहेर जाण्याची तर कल्पनाही हे नागरिक करू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे.

    आतापर्यंत अनेक घरांत झालेल्या चोऱ्यांमध्ये चोरांनी लाखो रुपयांचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणात पोलीस काहीच उपाय करू शकत नसल्याचं लक्षात आल्यावर नागरिकांनी हतबलतेतून चोरांसाठी पाट्या लावल्या आहेत.