चिंता वाढली : भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

भारत आता जगभरातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून 1,35,27,717 वर पोहोचली आहे.

    नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांचीा संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. दरम्यान सर्वाधिक बाधित रुग्णांच्या बाबतीत भारताने ब्राझीललाही मागे टाकलं आहे. यासोबतच भारत आता जगभरातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून 1,35,27,717 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 12 लाखाहून अधिक झाली आहे.

    दरम्यान कोरोनामुळे सोमवारी 904 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेचं आतापर्यंतचा मृतांचा आकडा 1,70,179 वर पोहोचला आहे. देशात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर 90% टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विश्वविद्यालयाच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक बाधित रुग्णांच्या बाबतीत भारतानं ब्राझीलला मागे टाकलं आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 1,34,82,023 रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 3,11,98,055 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. तर, जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 13 कोटी 61 लाखांवर पोहोचला आहे.

    मागील चोवीस तासात 904 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील 349, छत्तीसगड 122, उत्तर प्रदेश 67, पंजाब 59, गुजरात 54, दिल्ली 48, कर्नाटक 40, मध्य प्रदेश 24, तमिळनाडू 22, झारखंड 21, केरळ आणि हरियाणा प्रत्येकी 16 आणि राजस्थान तसंच पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 10 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत 1,70,179 जणांचा मृत्यू झाल आहे. यातील सर्वाधिक 57,987 रुग्ण हे महाराष्ट्रातील होते. आरोग्य मंत्रालयानं सांगितलं, की ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, यातील 70% टक्क्यापेक्षा अधिक लोकांना आधीपासूनच काहीतरी आजार होते.