योगी सरकारमधील राज्यमंत्री विजय कश्यप यांचे कोरोनाने निधन ; महिन्याभरात पाच आमदाराचे निधन

विजय कश्यप हे योगी सरकारमध्ये पूर व्यवस्थापन राज्यमंत्री होते. त्यांना २९ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच  त्यांचे निधन झाले.

    लखनऊ: कोरोनायाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील राज्यमंत्री विजय कश्यप यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर मेंदाता रुग्णालयात उपचार सुरू होते.
    विजय कश्यप हे योगी सरकारमध्ये पूर व्यवस्थापन राज्यमंत्री होते. त्यांना २९ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच  त्यांचे निधन झाले. ते मुजफ्फर नगरमधील चरथावल विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कश्यप यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे ते नेते होते. ते नेहमी जनहिताची कामे करायचे, असे मोदी यांनी शोक संदेशात म्हटलं आहे.

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कश्यप यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. कश्यप हे लोकप्रिय नेते होते. त्यांनी मंत्री म्हणून अत्यंत चांगलं काम केलं आहे. ते जनतेचे सच्चे सेवक होते, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही कश्यप यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

    महिन्याभरात पाच भाजप आमदारांचं निधन
    उत्तर प्रदेशात महिन्याभरात पाच भाजप आमदारांचं कोरोनानं निधन झालं आहे. सुरेश श्रीवास्तव, रमेश चंद्र दिवाकर, केसर सिंह गंगवार, बहादूर कोरी आणि विजय कश्यप या पाच आमदारांचं कोरोनाने निधन झालं आहे.