आधी त्या महिलेला दिली कोव्हिशिल्ड मग ५ मिनिटांनी दिली कोव्हॅक्सिन, आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा दाखवणाऱ्या घटनेने उडाली खळबळ

लसीकरणादरम्यान (Vaccination Chaos) एका महिलेला ‘कोव्हॅक्सिन’(Covaxin), ‘कोव्हिशिल्ड’ (Covishield) या दोन्ही लस ५ मिनिटांच्या अंतराने लस देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली होती.

    बिहारमध्ये(Bihar) लसीकरणादरम्यान निष्काळजीपणाची(Carelessness In Vaccination) आणखी एक घटना उघडकीस आली आहे. लसीकरणादरम्यान (Vaccination Chaos) एका महिलेला ‘कोव्हॅक्सिन’(Covaxin), ‘कोव्हिशिल्ड’ (Covishield) या दोन्ही लस ५ मिनिटांच्या अंतराने लस देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. सुदैवाने दोन्ही वेगवेगळ्या लसी घेतल्यानंतरही अद्याप कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत आणि तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

    पाटण्याच्या ग्रामीण भागात ही घटना घडली. १६ जून रोजी सुनीला देवी नावाच्या महिलेला ५ मिनिटांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या लसी देण्यात आल्या. कोविड -१९वरील लस घेण्यासाठी ६३ वर्षीय सुनीला देवी पुनपुन ब्लॉकमधील बेलदरीचक माध्यमिक शाळेत गेल्या होत्या. तेथील नर्स चंचला कुमारी आणि सुनीता कुमारी यांनी दुर्लक्ष केले आणि या महिलेला दोन वेगवेगळ्या लस दिल्या.

    लसीकरण केंद्राच्या एका खोलीत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी दिल्या जात होत्या. दरम्यान, लस घेण्यापूर्वी सुनीला देवी यांनी प्रथम नोंदणी केली, त्यानंतर रांगेत उभे राहून पहिली कोव्हिशिल्ड लस घेतली. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी बसून रहायला सांगितले. याच दरम्यान दुसऱ्या नर्सने सुनीला देवी यांना कोव्हॅक्सिन लस दिली.

    “पहिली लस घेतल्यानंतर मी बसलेली असताना दुसऱ्या नर्सने पुन्हा लस दिली. मी तिला नकार दिला आणि एका हातावर लस घेतली असल्याचे सांगितले. त्यावर त्या नर्सने दुसरी सुद्धा त्याच हातावर घ्यावी लागेल असे सांगितले. त्यानंतर माझ्या दुसऱ्या हातावर लस दिली. असा निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी” असे सुनीला देवी यांनी सांगितले.

    लसीकरण केंद्रावर दोन्ही परिचारिकांकडून लस देताना निष्काळजीपणा केल्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी उत्तर मागितले आहे. या घटनेनंतर डॉक्टरांचे पथक सुनीला देवी यांच्यावर लक्ष ठेवून आहे. या घटनेच्या ३ दिवसानंतरही सुनीला देवी यांची प्रकृती स्थिर आहे.