तळीरामांना पडणार भुर्दंड, उत्तर प्रदेश सरकारने चक्क दारूवर लावला कोविड सेस

कोरोना संकट असल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने दारुवर सेस(Covid Sess on liquer) लावण्याचा निर्णय घेतला आहे.

    लखनऊ: उत्तर प्रदेश सरकारने(Uttar Pradesh) एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. कोरोना संकट असल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने दारुवर सेस(Covid Sess on liquer) लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तळीरामांना आता दारुवर १० ते ४० रुपये जास्त मोजावे लागणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने अबकारी धोरणात बदल केला आहे. त्यामुळे प्रति ९० मिली दारुवर तळीरामांना आता दहा रुपयांचे जादा शुल्क मोजावे लागणार आहे.

    कोविड सेसच्या माध्यमातून सरकारला राज्याचा महसूल वाढवायचा आहे. त्यातून होणाऱ्या मिळकतीचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढण्यास उपयोग होणार आहे. याबाबतचा शासन आदेश कालच सोमवारी जारी करण्यात आला आहे. दारुचे भाव वाढल्याने तळीरामांना मात्र फटका बसला आहे.

    उत्तर प्रदेशात दारुवर कोविड सेस आकारल्या गेल्याने दारुच्या किंमतीत १० ते ४० रुपयांची वाढ होणार आहे. प्रिमीयम कॅटेगिरीच्या दारुवर प्रति ९०मिलीला दहा रुपये मोजावे लागणार आहेत. सुपर प्रिमीयमवरील प्रति ९०मिलीवर २० रुपये आणि स्कॉचवरील प्रति ९० मिलीवर ३० रुपये मोजावे लागणार आहेत. त्याशिवाय इंपोर्टेड दारुवरील प्रति ९०मिलीवर ४० रुपये कोविड सेस आकारला जाणार आहे.

    यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने १ एप्रिल रोजी दारुचे दर वाढवले होते. यूपी सरकारने स्कॉच, वाईन, व्हिस्की आणि व्होडका सहीत सर्व दारुंवरील परमिट शुल्कात वाढ केली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशात विदेशी दारुंच्या किंमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर बियरच्या किंमती १० ते २० रुपयांनी कमी झाल्या होत्या.