३५०  कोटींच्या शिष्यवृत्ती घोटाळा उघड करणाऱ्याचा मृत्यू;  उत्तराखंडमध्ये पार्टीत गोळीबार

लांबा येथे एका पार्टीत सहभागी झाले होते. त्यांनी आपली पिस्तूल पाहण्यासाठी मुलीला दिली. पिस्तूलमध्ये गोळ्या नसेल, असा त्यांचा समज होता. मात्र, बुलेट चेंबरमध्ये एक गोळी होती.

 

हरिद्वार: उत्तराखंडमध्ये सुमारे ३५० कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा उघड करणाऱ्या ५० वर्षीय आरटीआय कार्यकर्ते पंकज लांबा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री एका पार्टीत सोळा वर्षीय मुलीने चुकीने गोळी झाडली, यात पंकज लांबा यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हरिद्वारच्या टिहरी निर्वासित कॉलोनीही घटना घडली. मुलीने बंदुकीतून झाडलेली गोळी लांबा यांच्या मानेला लागली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ सापडले आहे. आम्ही मुलीसह तेथे उपस्थित सर्वांचे जबाब नोंदवून घेतले असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती हरिद्वार एसएसपी सेंथिल ए. कृष्णा राज यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांबा येथे एका पार्टीत सहभागी झाले होते. त्यांनी आपली पिस्तूल पाहण्यासाठी मुलीला दिली. पिस्तूलमध्ये गोळ्या नसेल, असा त्यांचा समज होता. मात्र, बुलेट चेंबरमध्ये एक गोळी होती. घटनेच्या वेळी मुलीच्या बहिणीसोबत लांबाचे २ सहकारी, असे एकूण ५ जण उपस्थित होते. उल्लेखनीय आहे की, पंकज लांबा यांनी उघड केलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी सुरू आहे.