amrinder singh

सिद्धू (Siddhu) यांनी सांगितलं की, मी इथं तळागाळातील लोकांचा आवाज हायकमांडपर्यंत पोहोचवण्यासाठी आलो आहे. लोकशाही सत्तेबाबतची माझी भूमिका तशीच आहे.

    पंजाब काँग्रेसमध्ये(Punjab Congress) सुरू झालेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या दिवशी देखील पंजाब काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्ली हायकमांडकडून गठीत करण्यात आलेल्या तीन सदस्यीय पॅनलसोबत चर्चा केली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरोधात आघाडीवर असलेले पंजाब काँग्रेसचे नेते व आमदार नवज्योत सिंग सिद्धू यांचा देखील यामध्ये समावेश होता. या पॅनलशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रया दिली.

    सिद्धू यांनी सांगितलं की, मी इथं तळागाळातील लोकांचा आवाज हायकमांडपर्यंत पोहोचवण्यासाठी आलो आहे. लोकशाही सत्तेबाबतची माझी भूमिका तशीच आहे. जनतेचे अधिकार जनतेला परत मिळाले पाहिजे. मी स्पष्टपणे सत्य सांगितलं आहे.

    कोरोना संकटाला तोंड देत असलेल्या पंजाबमध्ये आता नवं राजकीय संकट देखील निर्माण झाल्याचं दिसत आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्या अगोदर पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस हायकमांडकडून यामध्ये लक्ष घातले जात आहे. काँग्रेस हायकमांडकडून पक्षाच्या आमदार व मंत्र्यांना दिल्लीत बोलवलं गेलं आहे. या ठिकाणी सर्व आमदार, मंत्री एका तीन सदस्यीय पॅनलशी चर्चा करत आहेत व आपले म्हणणे मांडत आहेत.

    निवडणुक काळात काँग्रेसकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पुर्तता न करण्यात आल्याच्या आरोपानंतर, काँग्रेस आमदारांकडून आपल्याच सरकारवर प्रश्न निर्माण केले जात होते. हे सर्व आमदार सातत्याने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करत होते. तर, लोकसभा निवडणुकीनंतर पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर येण्यास सुरूवात झाली. नवज्योत सिंग सिद्धू सातत्याने मुख्यमंत्री अमरिंदर सिंह याच्याविरुद्ध भूमिका घेताना दिसून आले आहे.