District Collector of Surajpur in Chhattisgarh Ranveer Sharma has been expelled for beating up a youth

छत्तीसगडमधील सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत जिल्हाधिकाऱ्यांनी एका युवकाला कानशिलात लगावल्याचे दिसते. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध तर केला जात होताच शिवाय हे कृत्य नागरी सेवेच्या मूलभूत नियमांच्या विरोधात असल्याचे मत व्यक्त करीत आयएएस असोसिएशननेही नाराजी व्यक्त केली होती. आता भूपेश बघेल सरकारने या जिल्हाधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी गौरव कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली असून शर्मांना मंत्रालयात तैनात करण्यात आले आहे.

    रायपूर : छत्तीसगडमधील सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत जिल्हाधिकाऱ्यांनी एका युवकाला कानशिलात लगावल्याचे दिसते. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध तर केला जात होताच शिवाय हे कृत्य नागरी सेवेच्या मूलभूत नियमांच्या विरोधात असल्याचे मत व्यक्त करीत आयएएस असोसिएशननेही नाराजी व्यक्त केली होती. आता भूपेश बघेल सरकारने या जिल्हाधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी गौरव कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली असून शर्मांना मंत्रालयात तैनात करण्यात आले आहे.

    घटना अतिशय दु:खद आणि निषेधार्ह आहे. राज्यात असे कृत्य सहन केले जाणार नाही. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याचे असे वागणे स्वीकारार्ह नाही असे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले.

    आयएएस असोसिएशनने ट्वीट करत म्हटले आहे की, सुरजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे कृत्य केले आहे ते अस्वीकाहार्य आणि सेवेच्या मूलभूत नियमांच्या विरोधात आहे. सनदी अधिकाऱ्याने नेहमी सहानुभूतीने वर्तन केले पाहिजे आणि अशा कठीण परिस्थितीत समाजाशी संवेदनशील राहिले पाहिजे, असे मत व्यक्त करीत आयएएस असोसिएशने जिल्हाधिकाऱ्यांच्या कृत्याचा निषेध केला.

    या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांनी सोशल मीडियावर आयएएस असोसिएशला टॅग करुन यासंबंधी जाब विचारला. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री बघेल यांनी कारवाई करावी, अशी मागणीही काही नागरिकांनी केली. यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांनी या घटनेवर माफी देखील मागितली आहे.

    कोरोनामुळे सुरजपूरमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शर्मा स्वत: बंदोबस्तावर हजर होते. त्यावेळी एक युवक कोरोना चाचणी करण्यासाठी जात होता. त्याने डॉक्टरांनी लिहिलेली चिठ्ठीही त्यांना दाखिवली परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी काही न ऐकता त्याच्या कानशिलात लगावली. यासोबतच त्याचा मोबाईलही फोडून टाकला व पोलिसांद्वारे त्यास मारहाणही केली होती.