कोरोनामुळे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, १८ दिवसांमध्ये घरातल्या चौघांचा मृत्यू,धक्का सहन न झाल्याने सुनेने उचलले टोकाचे पाऊल

मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यात एका कुटुंबावर कोरोनामुळे(whole family hurt due to corona) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

    देवास: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहारमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यात एका कुटुंबावर कोरोनामुळे(whole family hurt due to corona) दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    कोरोनामुळे देवासमधील एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. गेल्या १८ दिवसांत एका कुटुंबातील ४ सदस्यांचं कोरोनामुळे निधन झालं. हा धक्का सहन न झाल्याने घरच्या सुनेनं आत्महत्या केली. त्यामुळे आता कुटुंबात केवळ एक वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलं आहेत. देवासच्या मैनाश्री नगरात वास्तव्यास असलेल्या बालकिशन गर्ग यांच्या कुटुंबाच्या बाबतीत ही घटना घडली आहे.

    बालकिशन गर्ग यांची पत्नी चंद्रकला देवी यांचं सर्वात आधी कोरोनामुळे निधन झालं. १९ एप्रिलला गर्ग यांनी त्यांचा मोठा मुलगा संजय कोरोनामुळे गमावला. त्यानंतर २० एप्रिलला त्यांचा लहान मुलगा स्वप्नेशचं कोरोनामुळे निधन झालं. पत्नी आणि दोन मुलांच्या निधनामुळे गर्ग यांना धक्का बसला. घरावर आलेल्या संकटामुळे लहान सून रेखाने २१ एप्रिलला आत्महत्या केली.

    रेखाच्या आत्महत्येमुळे घरात केवळ बालकिशन गर्ग, त्यांची मोठी सून रितू आणि चार लहान लहान मुलं राहिली. अशातच रितू गर्ग यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी इंदूरच्या एका खासगी रुग्णालयात रविवारी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे आता कुटुंबात केवळ बालकिशन गर्ग आणि दोन मुलांची चार लहान मुलं आहेत.