sunderlal bahuguna

सुंदरलाल बहुगुणा(Sunderlal Bahuguna) यांना ८ मे २०२१ रोजी कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एम्स ऋषिकेशमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

    चिपको आंदोलनाचे(Chipko Movement) प्रणेते आणि पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा(Sunderlal Bahuguna Death) यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी कोरोनामुळे निधन झालं आहे. एम्स ऋषिकेशमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


    बहुगुणा यांना ८ मे २०२१ रोजी कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एम्स ऋषिकेशमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पर्यावरणवादी सुंदरलाल यांना कोरोनासोबत निमोनियाही झाला होता. त्यात त्यांना मधुमेह असल्याने उपचारादरम्यान अनेक अडचणी येत होत्या. तसेच त्यांची ऑक्सिजन लेव्हल ८६ वर आली होती. मधुमेह आणि ऑक्सिजन लेव्हल संतुलित करण्यासाठी  डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

    पर्यावरणवादी पद्मभूषण आणि स्वातंत्र्यसैनिक सुंदरलाल यांचा जन्म जानेवारी १९२७ला टिहरी जिल्ह्यातील मरोडा गावात झाला होता. त्यांचे वडील अंबादत्त बहुगुणा टिहरीत वनाधिकारी होते. सुंदरलाल हे १३ वर्षांचे असताना शहीद श्रीदेव सुमन यांच्या संपर्कात आले आणि तिथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

    पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी १९७३ साली चिपको आंदोलनाला सुरुवात केली होती. गडवाल हिमालयात वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाचा मोर्चा त्यांनी सांभाळला होता. गौरा देवी आणि अन्य साथीदारांसह त्यांनी चिपको आंदोलन सुरु केलं. २६ मार्च १९७४ साली चमोली जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिला झाडांना मिठी मारून उभ्या राहिल्या. हे आंदोलन संपूर्ण देशभर गाजलं.