गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी दोन वेळा गुजरातचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून नुकतीच त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती.

गेल्याच महिन्यात केशुभाई पटेल यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातून ते कसेबसे सावरत असतानाच सकाळी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

दोन वेळा मुख्यमंत्री

केशुभाई पटेल हे दोनदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. मात्र एकदाही ते आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करू शकले नाही. २००१ साली त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यांच्या जागी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केशुभाई पटेल यांना त्यांचे राजकीय गुरु मानत. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर गुजरात सोडताना त्यांनी केशुभाईंबाबत गौरवोद्गार काढले होते. गुजरातची जबाबदारी केशुभाईंच्या खांद्यावर असल्यामुळे आपण निर्धास्त असल्याचं मोदी म्हणाले होते.

राजकीय प्रवास

केशुभाई पटेल यांनी १९६० च्या दशकात आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. जनसंघाचा एक सामान्य कार्यकर्ता होण्यापासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. जनसंघाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. गुजरातमधील त्यांच्या कामामुळे १९७५ साली गुजरातमध्ये जनसंघ आणि काँग्रेस (ओ) यांच्या युतीचं सरकार स्थापन झालं. काँग्रेस ओ म्हणजेच काँग्रेसमधील विरोधी गट. त्यानंतर १९७७ साली केशुभाई पटेल हे राजकोटमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांची खासदारकीचा राजीनामा दिला आणि १९७८ ते १९८० या काळात बाबूभाई पटेल सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम केलं.

१९७८ ते १९९५ या काळात कलावाड, गोंडल आणि विशावादार या मतदारसंघांतून ते विधानसभेवर निवडून गेले. एकूण ६ वेळा ते विधानसभेचे आमदार झाले. अगोदर जनसंघातून आणि १९८० नंतर भारतीय जनता पार्टीतून त्यांचं कार्य सुरू राहिलं. गुजरातमध्ये भाजपची व्होट बँक तयार करण्यात केशुभाई पटेल यांचंच सर्वाधिक योगदान असल्याचं मानलं जातं.

बंडखोरी आणि मनोमिलन

२०१२ साली त्यांनी भाजपला रामराम ठोकत वेगळा पक्ष काढला. गुजरात परिवर्तन पार्टी हा पक्ष स्थापन करून त्यांनी २०१२ ची विधानसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत पक्षाच्या हाती काहीच लागलं नाही. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी आपला पक्ष भाजपात विलीन केला.