उत्तरप्रदेशात ‘कप्पा’ व्हेरिएंट आढळल्याने खळबळ

उत्तरप्रदेशात कोरोनाचा नवा ‘कप्पा’ व्हेरिएंट आढळल्याने खळबळ उडाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचे नामकरण केले आहे. भारतात सापडलेला बी.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट ‘कप्पा’ आणि बी.1.617.2 हा व्हेरिएंट आता ‘डेल्टा’ या नावाने ओळखला जाणार आहे.

    लखनौ : उत्तरप्रदेशात कोरोनाचा नवा ‘कप्पा’ व्हेरिएंट आढळल्याने खळबळ उडाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचे नामकरण केले आहे. भारतात सापडलेला बी.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट ‘कप्पा’ आणि बी.1.617.2 हा व्हेरिएंट आता ‘डेल्टा’ या नावाने ओळखला जाणार आहे.

    हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 44 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे. दरम्यान, प्रशासनाने बीआरडी मेडिकल कॉलेजला संक्रामितांचे नाव आणि पत्त्यासह संपूर्ण माहिती मागविली आहे. मायक्रोबॉयोलॉजी विभाग प्रमुख डॉ. अमरेश सिंह यांनी कप्पा व्हेरिएंट उत्तर प्रदेशात प्रथमच आढळला असल्याची माहिती दिली.

    पहिला रुग्ण गोरखपूरमध्ये आढळला असल्याचे ते म्हणाले. ज्या लोकांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते ते गंभीर आजाराने ग्रस्त होते अशी माहिती सिंह यांनी दिली. त्यापैकी अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला होता, असेही ते म्हणाले. 27 रुग्णांच्या नमून्यांपैकी दोन रुग्णांमध्ये डेल्टा प्लस तर एका रुग्णाला कप्पा व्हेरिएंटची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.