Former Kolkata High Court Judge C. S. Karnan was arrested in Chennai on Wednesday

कोलकाता : न्यायाधिशांविरोधात टिपण्णी केल्याप्रकरणी हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशांना अटक झाली आहे.  कोलकाता हायकोर्टाचे माजी न्यायाधीश सी. एस. कर्णन यांच्यावर बुधवारी चेन्नईत अटकेची कारवाई करण्यात आली. महिन्याभरापूर्वी त्यांनी हायकोर्टाचे आजी-माजी न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात टीका टिपण्णी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेय.

मद्रास हायकोर्टातील एका वकिलाने तक्रार केल्यानंतर चेन्नई पोलिसांच्या सायबर सेलने २७ ऑक्टोबर रोजी  त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.  मद्रास हायकोर्टातील काही वरिष्ठ वकिलांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडे कर्णन यांच्याविरोधात एक पत्र लिहिले होते. यामध्ये एका व्हिडिओबाबत भाष्य करण्यात आलं आहे. व्हिडिओत कर्णन यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहेत. तसेच न्यायिक अधिकाऱ्यांना धमकावले आहे. न्यायाधीशांच्या पत्नींना बलात्कारांच्या धमक्या दिल्या आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.

सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्ट काही न्यायाधीश महिला वकिलांचा आणि कोर्टातील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ करतात. यामध्ये त्यांनी पीडित महिलांची नावं देखील घेतली असल्याचा आरोप कर्णन यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे.

कायम वादाच्या भोवऱ्यात असलेले न्या. कर्णन यांचा कथीत व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कर्णन महिलांबाबत वाईट टिपण्णी करत आहेत. याचिकेत या व्हिडिओला शिक्षेसाठी पुरावा म्हणून मानावं असं आवाहन केलं आहे. बार काउन्सिलच्या माहितीनुसार, कर्णन हे न्याय व्यवस्थेसमोरील संकट झाले आहेत, विशेष म्हणजे कर्णन हे न्यायाधीश असतानाही त्यांनी तुरुंगाची हवा खाल्ली आहे.