फ्री सिलिंडर आणि महिन्याला १५०० रुपये; तामिळनाडू निवडणुकीत सरकारची खैरात

देशभरात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या असतानाच मुख्यमंत्र्यांनी तामिळनाडूतील प्रत्येक कुटुंबाला वर्षभरात सहा सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे तर ज्या कुटुंबाची प्रमुख महिला आहे त्यांना दर महिन्यात १५०० रुपयेही दिले जाणार आहेत.

  चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी यांनी निवडणुकीपूर्वी जनतेसाठी आकर्षक घोषणा केल्या आहेत. देशभरात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या असतानाच मुख्यमंत्र्यांनी तामिळनाडूतील प्रत्येक कुटुंबाला वर्षभरात सहा सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे तर ज्या कुटुंबाची प्रमुख महिला आहे त्यांना दर महिन्यात १५०० रुपयेही दिले जाणार आहेत.

  महिलांना दर महिन्याला ही रक्कम दिल्यास उत्पन्नात समानता येईल, असा दावाही त्यांनी केला. जाहीरनाम्यात जे आश्वासन देण्यात आले आहे ते राज्यातील नागरिकांच्या गरजेनुसार आहेत असेही ते म्हणाले. यासोबतच राज्यात पुन्हा सत्ता प्राप्त करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केली.

  आमच्याच जाहिरनाम्याची मुख्यमंत्री पलानीस्वामींनी कॉपी केली असा आरोप द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी केला आहे. उल्लेखनीय असे की द्रमुकने रविवारी जो जाहिरनामा जाहीर केला होता त्यात राज्यातील कुटुंब प्रमुख महिलेला दर महिन्याला एक हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. दुसरीकडे, एमएनएम अध्यक्ष आणि अभिनेता कमल हसन यांनीही स्टॅलिन यांच्यावर त्यांच्या पक्षाच्या जाहिरनाम्यातील मुद्दे चोरल्याचा आरोप केला. तथापि स्टॅलिन यांनी त्यांचा जाहीरनामा युरोपियन मॉडलवर असल्याचा दावा केला.

  अद्रमुक-भाजपाला झटका – अभिनेता विजयकांतने सोडली साथ

  तामिळनाडूत अद्रमुक-भाजपा युतीला निवडणुकीपूर्वीच जबर झटका बसला आहे. अभिनेता विजयकांत यांच्या नेतृत्वातील डीएमडीके या पक्षाने पुढील महिन्यात होत असलेल्या निवडणुकांपूर्वीच युतीतून काढता पाय घेतला आहे. तीन टप्प्यातील चर्चेनंतरही अद्रमुकने दिलेल्या आश्वासनानुसार जागा देण्यास नकार दिल्याचे कारण त्यांनी पुढे केले.

  राज्यात 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होत असून दोन मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. विशेष म्हणजे जे. जयललिता यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत अद्रमुकची अग्निपरीक्षा आहे.

  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अद्रमुकने राज्यातील ३९ पैकी ३७ जागांवर विजय मिळविला होता. या निवडणुकीत पक्षाला ४४.३ टक्के मताधिक्य प्राप्त झाले होते. दुसरीकडे ५.१ टक्के मते प्राप्त झाल्यानंतरही विजयकांतच्या पक्षाला एकही जागा मिळू शकली नव्हती. २०१९ च्या राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी प्रमुख विरोधी पक्ष द्रमुकने डीमडीकेने युतीसंदर्भात संपर्क साधला होता, असा दावा केला होता.

  MNM लढविणार 154 जागा

  अभिनेता कमल हसन यांच्या मक्कल निधी माईम (एमएनएम) या पक्षाने राज्यातील निवडणुकांसाठी घटक पक्षांसोबत जागावाटपाला अंतिम रूप दिले आहे. राज्यातील 234 जागांपैकी त्यांचा पक्ष 154 जागा लढविणार असून उर्वरित 80 जागा त्यांचे दोन घटक पक्ष एआयएसएमके आणि आयजेके लढविणार आहेत. तथापि जागा वाटपाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एमएनएमने चार टक्के मताधिक्य प्राप्त केले होते.