जास्त मुलांना जन्म द्या, 1 लाख रुपये मिळवा; मंत्र्याची घोषणा

भारताच्या ईशान्येकडील राज्य मिझोरामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. मिझोराममध्ये अधिक मुलांना जन्म देण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले जात आहे. मिझोराम सरकारमधील मंत्र्याने जास्त मुलं असणाऱ्या पालकांना 1 लाख रुपये रोख प्रोत्साहन म्हणून दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मतदारसंघातील मिझो समुदायाची लोकसंख्या वाढावी यासाठी क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमाविया रोयटे यांनी ही घोषणा केली आहे.

    नवी दिल्ली : देशातील वाढती लोकसंख्या चिंतेचा विषय ठरली आहे. चीननंतर भारताचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी देशात विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. नुकतेच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी दोनपेक्षा अधिक मुल असणाऱ्या लोकांना सरकारी नोकरी मिळणार नाही असं जाहीर केलं आहे. दोनपेक्षा अधिक मुलं असणाऱ्यांना सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेता येत नाही. असे असताना भारताच्या ईशान्येकडील राज्य मिझोरामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. मिझोराममध्ये अधिक मुलांना जन्म देण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले जात आहे.

    मिझोराम सरकारमधील मंत्र्याने जास्त मुलं असणाऱ्या पालकांना 1 लाख रुपये रोख प्रोत्साहन म्हणून दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मतदारसंघातील मिझो समुदायाची लोकसंख्या वाढावी यासाठी क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमाविया रोयटे यांनी ही घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी किती मुलं असावेत याबाबत रॉबर्ट यांनी माहिती दिलेली नाही. देशातील अनेक राज्ये लोकसंख्या नियंत्रण पॉलिसी आणत असताना मिझोराम सरकारमधील मंत्र्याच्या घोषणेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    ‘फादर डे’च्या आयोजित कार्यक्रमात रोयटे यांनी जाहीर केलं की, ‘त्यांच्या Aizawl East-2 मतदारसंघात जास्तीत जास्त मुलं असणाऱ्या पालकांना 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. याशिवाय व्यक्तीला एक सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देण्यात येईल’. रोयटे पुढे म्हणाले की, ‘प्रजोत्पादन दर आणि मिझोराममधील लोकसंख्या वाढीतील घट चिंतेचा विषय आहे. छोट्या समुदायामुळे त्यांच्या सुरक्षा आणि विकासामध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच घटत्या लोकसंख्येमुळे अनेक क्षेतात विकास थांबला आहे.’

    भारताच्या ईशान्येकड असलेल्या मिझोरामची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 10 लाख 91 हजार 014 इतकी आहे. राज्याचे क्षेत्रफळ 21,087 चौरस किलोमीटर आहे. मिझोरामची लोकसंख्येची घटना 52 आहे. याचा अर्थ दर चौ. किमी. क्षेत्रफळात 52 लोक राहतात. अरुणाचल प्रदेशनंतर सर्वात कमी लोकसंख्येत मिझोरामचा क्रमांक लागतो. अरुणाचलची लोकसंख्येची घनता 17 आहे. देशाची सरासरी 382 चौ. किमी आहे.