विधानसभेसाठी गुजरात काँग्रेसला हवा ममतांचा हात, गेहलोत, कमलनाथ यांना प्रभारी करा; काँग्रेसच्या नेत्यांची मागणी ?…

नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांना टक्कर देण्यासाठी पश्च‍िम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत हातमिळवणी करण्यासाठी गुजरातमधील काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना गुजरातचे प्रभारी म्हणून नियुक्त करावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

    नवी दिल्ली : गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापासून तयारी सुरू केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांना टक्कर देण्यासाठी पश्च‍िम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत हातमिळवणी करण्यासाठी गुजरातमधील काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना गुजरातचे प्रभारी म्हणून नियुक्त करावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

    दरम्यान गुजरातचे प्रभारी असलेले काँग्रेसचे प्रभारी आणि खा. राजीव सातव यांचे नुकतेच निधन झाले. त्यापूर्वी ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचाही मृत्यू झाला होता.
    दोन जबाबदार नेत्यांच्या अनुपस्थितीत गुजरात काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत संघर्ष करावा लागू शकतो. ही जागा भरून काढण्यासाठी गेहलोत आणि कमलनाथ यांच्यावर गुजरातची जबाबदारी सोपविली पाहिजे. तसेचं दोन्ही नेत्यांना यापूर्वी गुजरातच्या निवडणुकीचा अनुभव आहे. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस समितीने याबाबत फार प्रयोग करू नये, गुजरातमधील काँग्रेसच्या एका माजी खासदाराने सांगितले.

    गुजरात काँग्रेसचा एक गट ममता बॅनर्जी यांना संपर्क करण्याच्या तयारीत आहे. ममतांचा हात काँग्रेसला मिळाल्यास गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराला बळकटी येईल, असे या गटाला वाटते. गांधी परिवाराशी जवळीक असलेल्या एका काँग्रेस नेत्याने सांगितले, की ममतांना ते काँग्रेसपासून वेगळे पाहत नाहीत.

    तसेच ममतांचा गुजरातमध्ये प्रवेश झाल्यास काँग्रेसची जागा घेऊ पाहणाऱ्या आम आदमी पार्टीचेही मनसुबे उधळून लावता येतील. बिहार आणि महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्ये काँग्रेस तिसऱ्या स्थानावर फेकले जाऊ नये, असे या नेत्यांना वाटते.