हुंडा दिला नाही म्हणून नवऱ्याने केला भयानक प्रकार, मित्रांकडून पैसे घेऊन बायकोवर बलात्कार करण्याची दिली त्यांना मुभा – अत्याचाराचा प्रकार समजल्यावर पोलिसही हादरले

मुलींचा हुंड्यासाठी छळ होण्याच्या घटना घडतच असतात. मारहाण, मानसिक छळ करून विवाहितेला त्रास दिला जातो. अनेकदा अशा घटनांमध्ये क्रूरतेची परिसीमा गाठलेली दिसते. अशीच एक घटना राजस्थानमधील( Gang Rape In Rajasthan) धौलपूर जिल्ह्यात (Dholpur) घडली आहे.

    नवी दिल्ली: आपल्या देशात हुंडाविरोधी कायदा(Law Against Dowry) असूनही आजही  मुलींचा हुंड्यासाठी छळ होण्याच्या घटना घडतच असतात. मारहाण, मानसिक छळ करून विवाहितेला त्रास दिला जातो. अनेकदा अशा घटनांमध्ये क्रूरतेची परिसीमा गाठलेली दिसते. अशीच एक घटना राजस्थानमधील( Gang Rape In Rajasthan) धौलपूर जिल्ह्यात (Dholpur) घडली आहे.

    धौलपूर जिल्ह्यातील बसेडी (Basedi) भागात एका पतीनेच पैसे घेऊन आपल्या मित्रांना आपल्या बायकोवर बलात्कार (Rape) करण्याची मुभा दिली. दोन दिवस या महिलेवर अनेकांनी बलात्कार केला आणि त्यासाठी पतीने त्या लोकांकडून पैसे घेतल्याची तक्रार या महिलेने केली आहे. इतकंच नव्हे तर जीवाचा थरकाप उडेल असे अत्याचार या महिलेवर करण्यात आले असून, हुंडा दिला नाही म्हणून त्याची वसुली करण्यासाठी तिच्या नवऱ्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

    पीडित महिलेनं आपला भाऊ आणि वहिनी यांच्याबरोबर पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली तेव्हा तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून पोलीस हादरले. त्यांनी तक्रार नोंदवून घेत तिच्या नवऱ्याला आणि यात सहभागी असलेल्या लोकांना पकडण्यासाठी कारवाई सुरू केली. तेव्हा तिचा नवरा आणि त्याचे कुटुंबीय घर सोडून पळून गेल्याचं उघड झालं. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचं तपास अधिकारी प्रवेंद्र सिंह यांनी सांगितलं.

    पोलिसांना महिलेने दिलेल्या माहितीनुसार,चार दिवसांपूर्वी ही घटना घडली. शनिवारी रात्री बाराच्या सुमारास महिलेचा नवरा मित्रासह घरी आला आणि त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. तिनं विरोध केला, ती ओरडू लागली तेव्हा त्यानं मित्राच्या मदतीनं तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि नंतर तिच्या गुप्तांगांत (Private Part) मिरची पूड घातली. त्यानंतर त्यान तिच्या गुप्तांगांवर झंडू बाम लावला. त्यामुळे होणाऱ्या असह्य वेदनांमुळे ती बेशुद्ध पडली. आणखीही काही घाणेरडी कृत्यं त्यांनी तिच्यासोबत केली. तिला खोलीतच कोंडून ठेवून दुसऱ्या दिवशी आणखी काही लोकांनीही तिच्यावर बलात्कार केला.

    जानेवारीमध्ये या महिलेचं लग्न झालं होतं. तिचा नवरा मार्बल फिटिंगचं काम करतो. लग्नानंतर काही दिवसातच तिच्या सासरच्या लोकांनी तीन लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तिचा छळ करायला सुरुवात केली होती. तिला मारहाण करण्यात येत होती. तिनं तिच्या वडिलांना हे सांगितल्यावर ते तिच्या घरी आले आणि त्यांनी तिच्या सासरच्या मंडळीशी बोलणी केली. त्यानंतर गेल्या शनिवारी  तिच्या नवऱ्यानं तिच्यावर हे पाशवी अत्याचार केले. या पीडित महिलेचा भाऊ आणि वहिनी यांनीही लग्नानंतर तिचा नवरा सतत फक्त पैशाची मागणी करत असल्याचं पोलिसांना सांगितलं.