I am the tenth incarnation of Vishnu; Strange claim of a government employee

  अहमदाबाद : आपली ग्रॅच्युईटी मिळविण्याचा प्रयत्न करताना एका व्यक्तीने चक्क ‘भगवान विष्णू’चा अवतार असल्याचा दावा केला आहे. इतकेच नाही तर ग्रॅच्युईटी मिळाली नाही तर आपल्या दिव्य शक्तींसहीत जगाला दुष्काळाचा शाप देईन, अशी धमकीही या व्यक्तीने दिली. या अजब दाव्यामुळे ही व्यक्ती भलतीच चर्चेत आली. गुजरातचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीचे नाव आहे रमेशचंद्र फेफर…. रमेशचंद्र गुजरातच्या जलसंपदा विभागात इंजिनीअर म्हणून कार्यरत होते. वेळेपूर्वीच सेवानिवृत्त झालेल्या फेपर आपल्या ग्रॅच्युईटीचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

  पत्राद्वारे दिला इशारा

  रमेशचंद्र फेफर यांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांना 1 जुलै रोजी एक पत्र लिहिले. सरकारमध्ये बसलेल्या राक्षसांनी आपली 16 लाख रुपयांची ग्रॅच्युईटी आणि एका वर्षाचे 16 लाख रुपयांचे वेतन रोखून त्रास देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप फेफर यांनी या पत्रात केला. सोबतच, मी भगवान विष्णूचा दहावा अवतार ‘कल्की’ आहे, मला त्रास दिला तर जबरदस्ती दैवीशक्तींसहीत धरतीवर कडक दुष्काळ आणू शकतो, अशी धमकीवजा वाचाळ बडबडही फेफर यांनी केल्याने ते चर्चेत आले.

  ‘…तर जगात दुष्काळ’

  आपल्या रूपात भगवान ‘कल्की’ धरतीवर उपस्थित असल्यानेच गेल्या दोन वर्षांत भारतात चांगला पाऊस झाला. देशात एक वर्षही दुष्काळ पडला नाही. गेल्या 20 वर्षात चांगला पाऊस झाल्याने भारताला 20 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. यानंतरही सरकारी राक्षस मला जाणूनबुजून त्रास देत आहेत. याचमुळे यंदाच्या वर्षी संपूर्ण जगात कडक दुष्काळ सहन करायला भाग पाडू शकतो, असे रमेशचंद्र फेफर यांनी म्हटले. जलसंसाधन विभागाचे सचिव एम के जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयात हजेरी लावल्याशिवाय रमेशचंद्र फेफर वेतनाची मागणी करत आहेत.

  आठ महिन्यांत 16 दिवस कार्यालयात हजर

  या अगोदरही ते 2018 साली चर्चेत आले होते. त्यावेळीही त्यांनी स्वत:ला विष्णूचा अवतार घोषित करत कामावर येण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्यांनी आठ महिन्यांच्या कालावधीत केवळ 16 दिवस कार्यालयात हजेरी लावली होती. यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. यानंतर रमेशचंद्र फेफर यांना सरकारी वेळेपूर्वीच सेवानिवृत्ती देण्यात आली होती.