अनैतिक संबंध म्हणजे महिला चांगली आई नाही असा होत नाही; हायकोर्टाची टिप्पणी

आपल्या साडे चार वर्षांच्या मुलीच्या ताब्यासाठी दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर निर्णय सुनावताना पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. पत्नी विवाहबाह्य संबंधांत असल्याने आपल्या मुलीचा ताबा तिच्या आईकडे देण्यात येऊ नये, असा दावा पतीने न्यायालयासमोर केला होता. यावर 'अनैतिक संबंधांचा अर्थ महिला चांगली आई होऊ शकत नाही, असा होत नाही' अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली.

    चंदीगड : आपल्या साडे चार वर्षांच्या मुलीच्या ताब्यासाठी दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर निर्णय सुनावताना पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. पत्नी विवाहबाह्य संबंधांत असल्याने आपल्या मुलीचा ताबा तिच्या आईकडे देण्यात येऊ नये, असा दावा पतीने न्यायालयासमोर केला होता. यावर ‘अनैतिक संबंधांचा अर्थ महिला चांगली आई होऊ शकत नाही, असा होत नाही’ अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली.

    एखादी महिला विवाहबाह्य संबंधात असेल तर याचा अर्थ ती महिला चांगली आई होऊ शकणार नाही, असा लावला जाऊ नये, असे पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने म्हटले. ‘द हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशीप अॅक्ट 1956’च्या कलम 6 नुसार, पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी त्यांच्या आईलाच ‘नॅच्युरल गार्डियन’ अर्थात ‘नैसर्गिक पालक’ मानले गेले, असेही कोर्टाने आपल्या निर्णयात नमूद केले. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या देखभालीसाठी त्यांची नैसर्गिक संरक्षक अर्थात आई सर्वांत जास्त गरजेची ठरते. अशावेळी आईला पाल्याचा ताबा देण्यापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले.

    यासाठी उच्च न्यायालयाने एका ताज्या प्रकरणाचे उदाहरण देतानाच ‘देशात असे अनेक उदाहरणे आहेत जिथे एकल माता किंवा पित्याने आपल्या पाल्याचे पालन-पोषण केले आणि त्यांना जबाबदार नागरिक बनवण्याचे आपले कर्तव्य पूर्ण केले, असेही म्हटले.